Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:09 IST

मुंबई : देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तर पश्चिम रेल्वे ...

मुंबई : देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ या दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ यावेळेत सुटणारी डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्य स्थानावर येतील.

ठाण्याहून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६पर्यंत सुटणारी अप जलद सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबतील. पुढे या अप जलद सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानावर पोहोचतील.

हार्बर मार्गावर पनवेल - वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५पर्यंत मेगाब्लॉक (नेरूळ /बेलापूर-खारकोपर मार्ग वगळता) असणार आहे. पनवेल येथून सकाळी १०.४९ ते संध्याकाळी ४.०१पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ यावेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ यावेळेत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० यावेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी मार्गावर ब्लॉक दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.