मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांच्या जागा गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. या जागांवर सदस्यांची निवड करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने येत्या ७ जून रोजी स्थायी समितीची बैठक बोलावली आहे. या जागांवर आपली वर्णी लावण्यासाठी मनविसेने कंबर कसली आहे. विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप करंडे यांच्या निधनामुळे आणि प्राध्यापक गटातून डॉ. मधू परांजपे यांच्या निवृत्तीमुळे अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेतील दोन जागा रिक्त आहेत. विद्यापीठ कर्मचार्यांमधून नेमणूक होणार्या अधिसभा सदस्यांची निवडही अद्याप झालेली नाही. या जागा त्वरित भराव्यात, यासाठी विद्यार्थी संघटना प्रयत्नशील आहेत. या जागांवर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी मनविसे आणि युवासेनेकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली ही पदे भरण्यासाठी मुंबई विद्यापीठाने येत्या ७ जून रोजी स्थायी समितीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत रखडलेल्या जागांवर सदस्यांची निवड करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, युवासेनेतर्फे अधिसभेच्या जागेवर दिवंगत दिलीप करंडे यांची पत्नी सुप्रिया करंडे यांचे नाव चर्चेत आहे. व्यवस्थापन परिषदेकरिता युवासेनेकडून कोणाच्याही नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मनविसेकडून अधिसभेसाठी संतोष गांगुर्डे यांचे नाव चर्चेत आहे. व्यवस्थापन परिषदेसाठी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांचे नाव चर्चेत आहे. स्थायी समितीचे सदस्य स्पर्धेत असणार्या कोणाला पसंती देणार, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठ समितीची ७ जूनला बैठक
By admin | Updated: May 31, 2014 03:08 IST