Join us  

'माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो', तात्याराव लहानेंनी सांगितली आठवण

By महेश गलांडे | Published: January 31, 2021 9:34 AM

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ–संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देत्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो,' अशा शब्दात डॉ. तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडेंबद्दल भावना व्यक्त करत, त्यांच्या कार्याचे कौतुक केले. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर काही दिवसांपूर्वी बलात्काराचे आरोप झाले होते. त्यानंतर, राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती, विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात ठेवले. पण, काही दिवसांतच तक्रारदार महिलेनं त्यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली. त्यामुळे, धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर धनंजय मुंडेंचं सगळीकडे स्वागत होत आहे. अदहमनगर येथेही एका पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ–संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी भाषणादरम्यान तात्याराव लहानेंनी मागील सरकारवर काही आरोप केले. “गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला, पण धनंजय मुंडे माझ्या पाठिशी खंबीरपणे राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली. तसेच, धनंजय मुंडेंचं कौतुक करताना, माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय यांना मिळो, असेही तात्याराव लहानेंनी म्हटलं. यावेळी, उपस्थितांनी टाळ्या वाजून दाद दिली. 

“धनंजय मुंडेंना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. याच नात्याने धनंजय मुंडेंनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली. मी धनंजय मुंडेंचे जाहीर आभार मानीन,” असेही लहाने यांनी म्हटले. 'राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कायम गोरगरीब लोकांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो,' अशा शब्दात डॉ. तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडेंबद्दल भावना व्यक्त करत, त्यांच्या कार्याचे कौतुक केले.  

टॅग्स :धनंजय मुंडेपद्मश्री पुरस्कारडॉक्टरबीडअहमदनगर