Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकात वैद्यकीय कक्ष उभारणार

By admin | Updated: August 29, 2015 01:54 IST

पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर वैद्यकीय कक्ष (मेडिकल रूम) उभारण्याचे काम केले जात असतानाच मध्य रेल्वेवरील स्थानकांवरही हे कक्ष उभारण्यात येणार आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर वैद्यकीय कक्ष (मेडिकल रूम) उभारण्याचे काम केले जात असतानाच मध्य रेल्वेवरील स्थानकांवरही हे कक्ष उभारण्यात येणार आहे. यात प्रथम ठाणे आणि पनवेल स्थानकात वैद्यकीय कक्ष उभारण्याची तयारी सुरू असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. तर आणखी नऊ स्थानकांवर हे कक्ष उभारण्याचे नियोजन आहे. रेल्वे अपघात झाल्यावर ताबडतोब उपचार न मिळाल्यामुळे काही प्रवाशांना प्राणास मुकावे लागते. ही परिस्थिती पाहता प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश न्यायालयाकडून रेल्वेला देण्यात आले होते. त्यानुसार गर्दीच्या स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कक्षात एक डॉक्टर, नर्स आणि मदतनीस असणार आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रा, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, वसई रोड, विरार व पालघर स्थानकांत हे कक्ष उभारण्यात येणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र पहिल्या निविदेला काही महिन्यांपूर्वी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निविदा काढण्यात आली. प.रे.कडून यावर काम सुरू असतानाच मध्य रेल्वेनेही आपल्या गर्दीच्या स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्याची तयारी सुरू केली. यात प्रथम पनवेल आणि ठाणे स्थानकात हे कक्ष उभारण्यात येत असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. यानंतर आणखी नऊ स्थानकांवर ही सुविधा देण्यात येणार असून, यामध्ये कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, दिवा, डोंबिवली, कल्याण, कर्जत या मेन लाइनवरील तर हार्बरवरील वडाळा आणि वाशी स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे हद्दीत ट्रेनमधून पडून जखमी झालेल्या व्यक्तींना या वैद्यकीय कक्षात उपचार देण्यात येतील, असे ओझा यांनी सांगितले.