राजू काळे, भाईंदरराज्यातील महत्वांच्या शहरात मेथ उर्फ एमडी (मेफेड्रॉन) या नशील्या पदार्थाचा, अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यात समावेश नसल्याने त्याची खुले आम विक्री होत आहे. त्यातील कारवाईत पोलिसांना येणाऱ्या अडचणीवर राज्य शासनाने तोडगा काढला असुन मेथ ला अमली पदार्थाच्या यादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री दिपक सावंत तसेच गृहराज्यमंत्री (शहरी) डॉ. रणजित पाटील यांनी ११ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात झालेल्या चर्चेदरम्यान दिल्याचे चर्चेत सहभागी झालेले आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले. हा पदार्थ विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून कठोर कारवाईच्या सूचना पोलिसांना देणार असल्याचेही गृहराज्यमंत्र्यानी सांगितले. मीरा-भार्इंदरसह ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात मेथ या नशील्या पदार्थाची छुप्यामार्गाने विक्री होत असून त्याच्या जाळ्यात अनेक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुण पिढी सापडली आहे. त्याच्या सेवनामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या पदार्थाच्या विक्री प्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, या पदार्थाचा अमली पदार्थाच्या यादीत समावेश नसल्याने पोलिसांना कारवाईत तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. त्याला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी वरीष्ठ स्तरावर प्रयत्न सुरु असतानाच ११ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात या पदार्थाच्या बेकायदेशीर विक्रीवर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी आरोग्यमंत्री दिपक सावंत, गृहराज्यमंत्री (शहरी) डॉ. रणजित पाटील, आ. प्रताप सरनाईक आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता. त्यावेळी आ. सरनाईक यांनी ६ डिसेंबर रोजी लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारे आरोग्य मंत्र्यांकडे मेथला अमली पदार्थाचा दर्जा देण्यासह त्याला कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी केली होती. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी मेथ ला अमली पदार्थाचा दर्जा देण्याचे मान्य केल्यानंतर त्याचा कायद्यात समावेश करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
अमली पदार्थाच्या यादीत एमडी समाविष्ट होणार!
By admin | Updated: December 25, 2014 23:12 IST