Join us

आज ठरेल एमसीएचा ‘कर्णधार’

By admin | Updated: June 17, 2015 01:53 IST

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीचा ‘अंतिम सामना’ आज रंगणार

मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीचा ‘अंतिम सामना’ आज रंगणार असून, या निवडणुकीतून एमसीएचा ‘कर्णधार’ कोण, याची उत्सुकतादेखील संपेल. सत्ताधारी पवार - म्हाडदाळकर गटाचे उमेदवार व विद्यमाना एमसीए अध्यक्ष शरद पवार आणि क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांच्यामध्ये अध्यक्षपदाची मुख्य लढत आहे. दरम्यान, ३२९ क्लब्सच्या मतदानाने रंगणारी ही निवडणूक आता ३२६ क्लब्सच्या मतदानावर लढेल. तीन क्लब्सने एमसीएची वार्षिक फी भरली नसल्याने त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एमसीए सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सर्वाधिक कौल कोणाला मिळतो याची उत्सुकता आज संपेल.एमसीए अध्यक्षपद अनेकदा भूषविलेले राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. त्यात यंदा क्रिकेट फर्स्ट पॅनेलचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांनी थेट अध्यक्षपदासाठी आव्हान उभे केल्याने या वेळी सर्वांची उत्सुकता ताणली आहे. दोन वर्षांपूर्वी विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदी पवार यांची बिनविरोध निवड झालेली. विशेष म्हणजे त्या वेळी पाटील यांनी पवारांना पाठिंबा देत उपाध्यक्षपद पटकावले होते. मात्र यंदा मुंबई क्रिकेटमध्ये परिवर्तन झालेच पाहिजे, या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवताना थेट अध्यक्षपदासाठी पवारांसमोर आव्हान उभे केले. शिवाय शिवसेनेने क्रिकेट फर्स्ट गटाला जाहीर पाठिंबा दिल्याने चुरस वाढली आहे.उपाध्यक्षपदासाठीही अटीतटीची लढत होईल. पवार - म्हाडदळकर गटातून माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उमेदवारी दाखल केली असून, त्यांच्यासमोर क्रिकेट फर्स्टकडून माजी क्रिकेटपटू अ‍ॅबी कुरविल्ला आणि प्रताप सरनाईक यांचे आव्हान असेल. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी असा रंग चढला आहे.सह-सचिवपदासाठी रवी सावंत व पी. व्ही. शेट्टी यांच्या रूपाने पवार - म्हाडदळकर गटाने तगडे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. क्रिकेट फर्स्ट गटानेदेखील या पदासाठी डॉ. उन्मेश खानविलकर व माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांना उभे केले असल्याने ही लढत चुरशीची होईल. खजिनदार पदासाठी नितीन दलाल (पवार - म्हाडदळकर) व मयांक खांडवाला (क्रिकेट फर्स्ट) यांच्यात सामना रंगेल. शिवाय कार्यकारिणी सदस्यपदासाठीदेखील कडवी लढत रंगणार असून, यामध्ये दोन्ही गटांनी बलाढ्य उमेदवार उभे केले आहेत. बुधवारी रंगणारी ही निवडणूक दुपारी ३ ते सायं. ६:१५ पर्यंत वानखेडे स्टेडियम परिसरातील एमसीए कार्यालयात पार पडेल. पवार - म्हाडदळकर शरद पवार (अध्यक्षपद), दिलीप वेंगसरकर व आशिष शेलार (उपाध्यक्षपद), रवी सावंत व डॉ. पी. व्ही. शेट्टी (सह - सचिव पद), नितीन दलाल (खजिनदारपद), कार्यकारिणी पदाचे उमेदवार : विनोद देशपांडे, दीपक मूरकर, पंकज ठाकूर, रमेश वाजगे, दीपक पाटील, अरविंद कदम, अरमान मलिक, श्रीकांत तिगडी, नवीन शेट्टी, गणेश अय्यर, शाह अलम.पवार - म्हाडदळकर शरद पवार (अध्यक्षपद), दिलीप वेंगसरकर व आशिष शेलार (उपाध्यक्षपद), रवी सावंत व डॉ. पी. व्ही. शेट्टी (सह - सचिव पद), नितीन दलाल (खजिनदारपद), कार्यकारिणी पदाचे उमेदवार : विनोद देशपांडे, दीपक मूरकर, पंकज ठाकूर, रमेश वाजगे, दीपक पाटील, अरविंद कदम, अरमान मलिक, श्रीकांत तिगडी, नवीन शेट्टी, गणेश अय्यर, शाह अलम.डॉ. विजय पाटील (अध्यक्षपद), अ‍ॅबी कुरविल्ला व प्रताप सरनाईक (उपाध्यक्षपद), डॉ. उन्मेश खानविलकर व लालचंद राजपूत (सहसचिव पद), मयांक खांडवाला (खजिनदारपद), कार्यकारिणी सदस्यपदासाठी : प्रवीण आमरे, जगदीश गावंडे, दीपक जाधव, संगम लाड, नदीम मेमन, दाऊद पटेल, संजय पाटील, राजेंद्र फातरपेकर, सुरज समत, इक्बाल शेख, राहुल शेवाळे.