Join us

‘एआयबी’च्या वादात मनसेची उडी

By admin | Updated: February 4, 2015 02:33 IST

एआयबी’ या अश्लिल भाषेत सादर केल्या जात असलेल्या कार्यक्रमावर बंदी घालण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता मनसेने उडी घेतली आहे.

मुंबई : ‘एआयबी’ या अश्लिल भाषेत सादर केल्या जात असलेल्या कार्यक्रमावर बंदी घालण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता मनसेने उडी घेतली आहे. या कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी करतानाच कार्यक्रमात सहभागी करण जोहर, अर्जुन कपूर व रणवीर सिंग यांनी तात्काळ माफी मागितली नाही तर त्यांच्या चित्रपटांवर बंदीचा इशारा मनसेने दिला आहे.या कार्यक्रमातील सहभागी कलाकार करण जोहर, अर्जुन कपूर व रणवीस सिंग हे अश्लिल शेरेबाजीचा विकृत आनंद घेत असल्याचे दिसत आहे. या कलाकारांनी तात्काळ त्यांच्या या वर्तनाबद्दल माफी मागायला हवी. अन्यथा त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालू, असा इशारा मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला. यापूर्वी करण जोहर यांच्या ‘वेकअप सीड’ या चित्रपटात ‘मुंबई’ ऐवजी ‘बॉम्बे’ असा उल्लेख असल्याने मनसेने चित्रपट प्रदर्शनाला विरोध केला होता. अखेरीस चित्रपटापूर्वी माफीनामा दाखवून ‘बॉम्बे’ या उल्लेखाच्या ठिकाणी बीपचा आवाज वापरून मग चित्रपटाचे प्रदर्शन केले होते. (विशेष प्रतिनिधी)