नवी मुंबई : शहरातील सर्व प्रमुख विकासकामांचा शुभारंभ व उद्घाटनास महापौर उपस्थित राहतात. परंतु आता प्रभाग स्तरावरील छोट्या कामांच्या भूमिपूजनावरही त्यांनी दावा केला आहे. परस्पर कार्यक्रम करू नका, अगोदर मला सूचना द्या अशी विनंतीवजा सूचना त्यांनी प्रशासनास दिली आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये होणार्या विकासकामांचा शुभारंभ व उद्घाटन हे महापौरांच्या उपस्थितीत व्हावेत असा संकेत आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागात होणार्या चांगल्या कामास महापौर उपस्थित होतात. ज्या भूमिपूजन व उद्घाटनाच्या कार्यक्रमाची पत्रिका तयार केली जाते, त्यावर त्यांचे नाव टाकणे आवश्यक असते. शहरात हा संकेत पाळला जातो. परंतु प्रभाग स्तरावर गटार, पदपथ दुरूस्ती, उद्यान, मैदान व इतर डागडुजी अशाप्रकारची कामे होत असतात. या कामांचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक प्रभागातील नागरिकांना बरोबर घेवून करत असतात. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही अनेक वेळा यासाठी महापौरांना बोलवत नाहीत. परंतु यापुढे प्रत्येक कामाच्या ठिकाणी महापौर स्वत: उपस्थित राहणार आहेत. महापौर सागर नाईक यांनी महापालिका आयुक्तांना ४ जून रोजी पत्र लिहिले आहे. (जावक क्रमांक २२८१ / २०१४) सदर पत्र ५ जून रोजी प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहे. या पत्रामध्ये त्यांनी सांगितले आहे की, निमंत्रण पत्रिकेव्यतिरिक्त होणार्या कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमास मी स्वत: उपस्थित राहणार असल्याचे कळविले आहे. सदर पत्राची प्रत मुख्यालय उपआयुक्त, शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता, सर्व कार्यकारी अभियंता, सर्व उपअभियंता यांना देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर सत्ताधार्यांनी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी कोणतीही संधी न दवडण्याचे धोरण अवलंबले आहे. विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचे श्रेय घेण्यासाठी ही धडपड असल्याचे बोलले जात आहे. छोट्या कामांचाही सोहळा करायचा का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होवू शकला नाही. महापौरांच्या पत्रातील आशय नागरी कामांचे भूमिपूजन अथवा उद्घाटनाच्या विषयानुसार नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर या नात्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील निमंत्रण पत्रिका व्यतिरिक्त प्रभाग स्तरावर नागरी कामे परस्पर सुरू केली जातात. यापुढे नागरी कामे भूमिपूजन अथवा उद्घाटनप्रसंगी मी उपस्थित राहणार आहे. तरी प्रभाग समितीसह सर्व नागरी कामांचा शुभारंभ करणे अगोदर मला कल्पना देण्यात यावी. सर्व संबंधितांस त्याबाबत सूचना देण्यात यावी. अशाप्रकारे मजकूर सदर पत्रात देण्यात आला आहे.
प्रत्येक भूमिपूजनावर महापौरांचा दावा
By admin | Updated: June 6, 2014 22:40 IST