Join us  

पालिका प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 4:04 AM

मुंबई महापालिकेतील विविध योजना व प्रकल्प, तसेच धोरणात्मक निर्णयांची घोषणा पालिका प्रशासन व अधिकारी परस्पर करीत असल्याने महापौरांकडून संताप व्यक्त होत आहे.

मुंबई - मुंबई महापालिकेतील विविध योजना व प्रकल्प, तसेच धोरणात्मक निर्णयांची घोषणा पालिका प्रशासन व अधिकारी परस्पर करीत असल्याने महापौरांकडून संताप व्यक्त होत आहे. या हस्तक्षेपामुळे राज्य सरकारच्या परिपत्रकाचीच पायमल्ली होत असल्याची नाराजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केली आहे. यापुढे पालिकेचे प्रकल्प, योजना, धोरणात्मक निर्णयांंची प्रसिद्धी महापौरच करतील, अशी भूमिका त्यांनी केली आहे़ त्यामुळे महापौर विरुद्ध प्रशासनामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.पालिकेच्या महासभेत शिक्कामोर्तब झाल्यानंतर, मुंबई महापालिका राबवित असलेल्या विविध प्रकल्प, योजना आणि धोरणात्मक निर्णयांची घोषणा होऊन त्यावर काम सुरू होते. मात्र, गेल्या वर्षभरात पालिका प्रशासनाकडून महापौरांना विश्वासात न घेताच, परस्पर प्रकल्पांच्या घोषणा करण्यात येत आहे. यामुळे महापौरांना लोकशाही मार्गाने मिळालेल्या अधिकारांवर गदा येत आहे. याबाबत महापौर महाडेश्वर यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्त सत्ताधाऱ्यांना जुमानत नसल्याचाही आरोप होत आहे.मुंबईचा प्रथम नागरिक असल्याने पालिकेच्या योजना, प्रकल्प आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणे हा महापौरांचा अधिकार आहे. मात्र, आयुक्तांसह अनेक अधिकारी, खातेप्रमुख ही माहिती परस्पर जाहीर करीत असल्यामुळे चुकीचा पायंडा पडला आहे.याबाबत २००१ मध्ये राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने काढलेल्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे महापालिकेचे धोरणात्मक निर्णय, प्रकल्प-योजना प्रशासनाने परस्पर जाहीर करू नयेत, याची दक्षता घ्यावी, असा इशाराच महापौरांनी आयुक्तांना दिला आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका