Join us

महापौर आपलाच झाला पाहिजे, दिल्लीतून भाजपा नेत्यांना स्पष्ट सूचना

By admin | Updated: February 24, 2017 16:05 IST

कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आपला महापौर बसला पाहिजे अशा स्पष्ट सूचना दिल्ली मुख्यालयातून भाजपा नेत्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सर्वाना उत्सुकता लागलेल्या मुंबई महापालिकेचे निकाल हाती आले असून शिवसेना 84 जागांसह नंबर एकचा पक्ष ठरला आहे. मात्र भाजपानेही शिवसेनेला टक्कर दिली असून शिवसेनेपेक्षा फक्त दोनच जागा भाजपाला कमी मिळाल्या आहेत. 2012 च्या निवडणुकीत फक्त 31 जागा मिळवणा-या भाजपाने उंच झेप घेत 82 जागा मिळवल्या आहेत. इतक्या भक्कम परिस्थितीत असताना महापौरपदावरचा दावा सोडू नका, कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आपला महापौर बसला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना दिल्ली मुख्यालयातून भाजपा नेत्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 
 
('कावळे' म्हणून हिणवलेल्यांची सेनेत घरवापसी)
(मुंबईत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही - गडकरी)
 
बहुमत न मिळाल्याने आता शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार की दुसरे पर्याय निवडणार याकडे सर्वांचं लक्ष असून नेमकी काय भूमिका दोन्ही पक्ष घेणार आहेत हे येणा-या दिवसांमध्ये कळेल. शिवसेनेत दोन अपक्षांनी प्रवेश करत पाठिंबा दिल्याने त्यांचा आकडा 86 वर पोहोचला आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेसशी हातमिळवणी करुन बहुमताचा 114 आकडा पार करु शकते. त्यादृष्टीने भाजपाला हा पर्याय उपलब्ध नाही. काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न पाहणारा भाजपा काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे 'मुंबईत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही', असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. 
 
(शिवसेनेला 'हात' देण्याचे काँग्रेसचे संकेत)
(...म्हणून गुजराती समाजाने नाकारले शिवसेनेला)
 
त्यामुळे आता महापौरपदी आपला व्हावा यासाठी नवे डावपेच, कुरघोडी सुरु होणार असल्याचं दिसत आहे. दिल्लीवरुन महापौरपदाबाबत आक्रमक राहण्याचे आदेश आल्यानंतर राज्यातली भाजपही त्यादृष्टीने सक्रिय झाली आहे. महापौरपदाबद्दल विचारलं असता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी, प्रश्नच नाही, आमचाच महापौर मुंबईत असणार याबद्दल शंका नाही, अशी प्रतिक्रिया ‘एबीपी माझा’ला दिली आहे.