Join us  

कुटुंबासाठी मिळणारी गाडी महापौरांनी नाकारली 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 1:51 AM

लाल दिव्याच्या गाडीची हौस भागविण्याचा हट्ट आतापर्यंत अनेक महापौरांनी धरला. पण नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडून कुटुंबासाठी मिळणारी गाडी नाकारली आहे.

मुंबई - लाल दिव्याच्या गाडीची हौस भागविण्याचा हट्ट आतापर्यंत अनेक महापौरांनी धरला. नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडून कुटुंबासाठी मिळणारी गाडी नाकारली आहे. या गाडीसाठी येणारा खर्च महापौर निधीमध्ये द्यावा, अशी मागणी त्यांनी आयुक्त प्रवीणसिंग परदेशी यांच्याकडे केली आहे. तुटपुंज्या महापौर निधीत वाढ होण्याकरिता ‘महापौर रजनी’दात्यांना शंभर टक्के करमुक्तीची सवलत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.दुर्धर आजारांवरील उपचारासाठी पालिकेमार्फत महापौर निधीतून रुग्णांना आर्थिक मदती केली जाते. हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवरील उपचारांचा खर्चाच्या तुलनेत अवघे पाच हजार रुपये रुग्णांना मिळतात. त्यामुळे आर्थिक मुदतीमध्ये वाढ होण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. महापौर निधीमध्ये त्या तुलनेत वाढ होत नसल्याने मदत वाढविणे शक्य होत नाही. त्यामुळे महापौर निधीत भर पडण्यासाठी पुष्पगुच्छांऐवजी आर्थिक मदत स्वीकारणे, असे प्रयोग याआधी झाले आहेत.नवनिर्वाचित महापौर पेडणेकर यांनी वेगळी शक्कल लढविली आहे. महापालिकेकडून महापौरांच्या कुटुंबीयांनाही गाडी दिली जाते. ही गाडी नाकारून त्यासाठी येणा-या खर्चाची रक्कम महापौर निधीला देण्याची मागणी त्यांनी केली आहे. महापौर निधीसाठी काही वर्षांपूर्वी महापौर रजनी कार्यक्रम घेण्यात येत असे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्धार त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.|महापौर निधीसाठी मदत करणा-या दात्यांना करात केवळ ५० टक्के सवलत मिळते. दात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शंभर टक्के कर सवलत मिळावी, अशी मागणी करणार असल्याचेही महापौर पेडणेकर यांनी सांगितले.महापौर निधीतून कर्करोग, किडनी, हृदयविकाराने ग्रस्त, तसेच डायलिसीसच्या उपचारांकरिता मदत मिळण्यासाठी गरजू रुग्णांकडून मोठ्या संख्येने अर्ज येत असतात. मोठ्या आजारांवर उपचारासाठी महापौर निधीतून केवळ पाच हजार रुपये मिळतात.हृदय शस्त्रक्रिया, तसेच किडनी रोपण या आजारांनी ग्रस्त रुग्णांना प्रत्येकी २५ हजार, डायलिसीसच्या रुग्णांकरिता १५ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेतला होता.महापौर निधीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांचे एक महिन्याचे मानधन व महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन महापौर निधीला भेट देण्याचे आवाहन दरवेळी करण्यात येते.माझ्या कुटुंबात मी, माझा नवरा आणि मुलगा असे तिघेच आहोत. एवढ्या लहान कुटुंबासाठी गाडीची गरज काय? माझ्या नवºयाला आणि मुलाला गाडीने फिरण्याची हौस नाही. कुटुंबाला मिळणाºया गाडीऐवजी महापौर निधीसाठी मदत करावी, अशी मागणी केली आहे. - किशोरी पेडणेकर, महापौर

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहापौरमुंबई