Join us  

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापौर सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 8:23 PM

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सरसावल्या आहेत.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई-  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सरसावल्या आहेत.आज दुपारी 2 वाजता महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला आकस्मिक भेट देऊन मुंबई महानगर पालिकेतर्फे कोरोनाची महामारी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहॆ याची सविस्तर माहिती घेतली.यावेळी महापौरांसमवेत उपमहापौर अँड. सुहास वाडकर, विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे ,आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले,भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कदम,पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.भारमर,केइएमचे डॉ.प्रवीण बांगर उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी  कोरोना व्हायरस बद्दल कश्या पद्धतीने काळजी घेण्यात येत आहे? याची पाहणी करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर  आकस्मिक भेट देऊन  सर्व उपाययोजना व यंत्रणा याबाबत सविस्तर आढावा घेतला.तसेच नागरिकांना सर्व सामान्य स्वच्छतेचे नियमन करून या व्हायरसला न घाबरण्याचे आवाहन केलेे.

यावेळी महापौरांसह सुमारे एक तास आम्ही येथील वैद्यकीय सुविधांची पाहाणी केली.परदेशातून येथे येणाऱ्या प्रवाश्यांची स्क्रीनिग टेस्ट करण्यात येत असून त्यांना ताप आहे का याची खातरजमा थर्मोमीटरने देखिल करण्यात येत आहे.येथे शासनाच्या डॉक्टरांसह पालिकेचे तसेच जिव्हीकेच्या डॉक्टरांसह आणि स्टाफ सर्व वैद्यकीय  सुविधांसह येथेतैनात करण्यात आला आहे.

जर कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळल्यास त्यांना जवळच्या मरोळ येथील सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचाराची सुविधा देखिल  तैनात करण्यात आली आहे.जर प्रवाश्यांना ताप असेल तर किमान 15 दिवस घराच्या बाहेर पडू नका,जास्त त्रास होत असेल तर वेळीच उपचार करा अश्या सूचना देण्यात येत आहे.

परदेशातून येणारे प्रवासी हे फक्त काही तासांकरिता येथे थांबून दुसऱ्या विमानाने परतीच्या ठिकाणी जातात.त्यांची देखिल वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून जर कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना परत त्यांच्या देशात पाठवण्यात येत असल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी लोकमतला दिली.तसेच येथे येणाऱ्या प्रवाश्यांची यादी देखिल पालिकेच्या सर्व संबंधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात येत असून जर कोरोनाचा रुंग्ण आढल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करा अश्या सूचना खाजगी रुग्णालयांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस