Join us

महापौर मॅरेथॉन स्पर्धेस नेत्यांची दांडी

By admin | Updated: August 24, 2014 23:55 IST

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही स्पर्धा असल्यामुळे दहीहंडीप्रमाणेच धावपटूंचाही उत्साह वाढवण्यासाठी ही नेते मंडळी आवर्जून येईल, अशी अटकळ होती

ठाणे : रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथान स्पर्धेच्या उद्घाटनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे नेते विनोद तावडे, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह पालकमंत्री गणेश नाईक आदी नेते येणार असल्याचे महापालिकेने मोठा गाजावाजा करून जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात यांच्यापैकी कोणीही न आल्याने स्पर्धकांचा हिरमोड झाला़ या दांडीबहाद्दर नेत्यांविषयी अनेक स्पर्धकांनी नाराजी व्यक्त केली़ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही स्पर्धा असल्यामुळे दहीहंडीप्रमाणेच धावपटूंचाही उत्साह वाढवण्यासाठी ही नेते मंडळी आवर्जून येईल, अशी अटकळ होती. प्रत्यक्षात उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन मंत्री, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आदिवासी विकासमंत्री राजेंद्र गावित, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे उद्घाटक म्हणून तर विशेष अतिथी म्हणून शिवसेना नेते सुभाष देसाई आणि संजय राऊत उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात यांच्यापैकी कोणीही उपस्थित न राहिल्याने शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, महापौर हरिश्चंद्र पाटील आणि मकरंद अनासपुरे, शरद पोंक्षे या चित्रपट अभिनेत्यांवरच समारोपाचा कार्यक्रम उरकावा लागला. अर्थात अनासपुरे आणि विजू माने या अभिनेत्यांनी खेळाडूंमध्ये चांगलाच उत्साह निर्माण केला. अनेक खेळाडूंसह पालिका अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासमवेत फोटो काढून घेण्याचीही हौस भागवून घेतली.