Join us

महापौर, उपमहापौर बिनविरोध?

By admin | Updated: June 23, 2015 00:59 IST

वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर तसेच उपमहापौरपदाची २९ जून रोजी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे

वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर तसेच उपमहापौरपदाची २९ जून रोजी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाकडे आवश्यक ते संख्याबळ नसल्यामुळे त्यांच्याकडून उमेदवार उभाच राहणार नसल्याचे चित्र महानगरपालिकेत आहे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी १०६ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. तर विरोधकांना २ आकडी संख्याही गाठता आली नाही. त्यामुळे विरोधीपक्षाकडून महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुका लढवण्याची शक्यता फार कमी आहे. यंदाचे महापौरपद इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित आहे. बहुजन विकास आघाडीकडून या पदासाठी प्रविणा हितेंद्र ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उपमहापौर पदासाठी मात्र अनेक नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये सध्याचे सभागृहनेते उमेश नाईक हे प्रथम क्रमांकावर आहेत. विरोधीपक्षाच्या गोटात यासंदर्भात अद्याप कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे विरोधक ही निवडणूक लढवणार नाही अशीच चर्चा सर्वत्र आहे. या निवडणुकीनंतर विरोधीपक्षनेतेपद कसे निर्माण करायचे याबाबतचा पेच प्रशासन कसे सोडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किरण चेंदवणकर या नगरसेविका वगळता अन्य ४ नगरसेवक नव्याने निवडून आल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर किरण चेंदवणकर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. किरण चेंदवणकर या दुसऱ्यांदा महानगरपालिकेवर निवडून आल्या आहेत. (प्रतिनिधी)