Join us

दहिसर येथे मध्यरात्री मराठीत स्वाक्षरी करून महापौरांनी साजरा केला मराठी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 21:55 IST

 महापौर किशोरी पेडणेकर यांची गाडी दहिसर पश्चिमेला रेल्वे स्थानकासमोर आली.

- मनोहर कुंभेजकरमुंबई--राज्याचे पर्यटन व उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत नाईट लाईफ सुरू झाले आहे.त्यामुळे मध्यरात्री उशिरा पर्यंत मुंबईकर जागे असतात.तर सकाळी लवकर सुरू झालेला  राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांचा दिवस मध्यरात्री उशिरा संपतो ही वस्तुस्थिती आहे.

आज गुरुवारी पहाटे 2.15 वाजता मुंबईच्या  महापौर किशोरी पेडणेकर यांची गाडी दहिसर पश्चिमेला रेल्वे स्थानकासमोर आली. निमित्त होते ते पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शितल म्हात्रे यांनी आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त दहिसर पश्चिम रेल्वे स्टेशन समोर शिवसेना शाखा क्रमांक 7 आयोजित "मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी" या स्वाक्षरी मोहिमेच्या उदघाटन कार्यक्रमाचे.यावेळी महापौरांनी चक्क मराठीत स्वाक्षरी करून मराठी भाषा दिन साजरा केला.विशेष म्हणजे सुमारे 100 शिवसैनिक ,महिला व नागरिक यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार महापौरांनी आर उत्तर येथील प्रभाग क्रमांक 7 मधील  संतोषी माता मार्ग, दहिसर स्कायवाॅक, दिपा हाॅटेल शेजारील रस्ता, दहिसर नदी यांची सुमारे एक तास पाहणी  केली.मध्यरात्री 3.15 वाजता दहिसरकरांचा निरोप घेत महापौर आपल्या राणीच्या बागेतील महापौर निवासस्थानाकडे रवाना झाल्या.

यावेळी शितल म्हात्रे,  विधानसभा संघटक व माजी नगरसेवक उदेश पाटेकर,नगरसेवक हर्षद कारकर, विधानसभा संघटक अविनाश लाड, विधानसभा समन्वयक किशोर म्हात्रे, शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे, प्रवीण कुवळेकर आणि  शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित स्वाक्षरी मोहिमेला सकाळी 9 ते 11 यावेळात सुमारे 700 दहिसरकरांनी मराठीत स्वाक्षरी केली अशी माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली.