मुंबई : मध्य रेल्वेवर सीएसटी ते ठाणे डीसी (१,५00 डायरेक्ट करंट ते २५000 अल्टरनेट करंट) परावर्तनाची नुसतीच चाचणी करण्यात आली. मात्र रेल्वे बोर्डाच्या प्रतीक्षेत असलेले डीसी-एसी परावर्तन २३ मेच्या मध्यरात्रीपासून कायमस्वरूपी केले जाणार आहे आणि त्यानंतर २४ मेपासून मध्य रेल्वेवरील सर्व गाड्या एसी परावर्तनावर धावतील. यामुळे ट्रेनचा वेग वाढण्यास मदत मिळेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. डीसी ते एसी परावर्तन केल्याने लोकल गाड्यांचा वेग वाढू शकतो. तसेच वीज बचतही होऊ शकत असल्याने पश्चिम रेल्वेकडून सर्वप्रथम डीसी ते एसी परावर्तनाचे काम आधीच करण्यात आले. त्यानंतर मध्य रेल्वेकडून सुरुवातीला ठाणे ते कल्याण परावर्तनाचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर ठाणे ते एलटीटी फक्त पाचव्या मार्गावर काम पूर्ण केले गेले. त्यानंतर ठाणे ते सीएसटी चारही मार्गांवर काम पूर्ण करून २0१४च्या डिसेंबरमध्ये चाचणीही करण्यात आली. मात्र एसी परावर्तन कायमस्वरूपी करण्यासाठी रेल्वेकडून मुहूर्त देण्यात आला नाही. आता सीएसटी ते ठाणेपर्यंत २३ मेच्या मध्यरात्रीपासूंन डीसी ते एसी परावर्तन करण्याला मुहूर्त देण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले. हे परावर्तन झाल्यास मध्य रेल्वेवरील ट्रेनचा वेग ताशी १00 किमीपर्यंत वाढवू शकतो, असे ते म्हणाले. मध्य रेल्वेमार्गावर १९२५ सालापासून डीसी परावर्तनावर ट्रेन धावत आहेत. त्यानंतर ९0 वर्षांत संपूर्ण भारतातील विद्युत प्रवाह एसी करण्यात आला.
२३ मे रोजी डीसी-एसी परावर्तनाला मुहूर्त
By admin | Updated: May 8, 2015 00:41 IST