Join us  

‘मावळा’ने खाेदले शंभर मीटरचे भुयार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 5:22 AM

सागरी किनारा मार्गातील एक टप्पा पूर्ण : ४७ कंकणाकृती कडाही उभारल्या

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेचा महत्वाकांक्षी मुंबई सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोड प्रकल्पाने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. मावळा या यंत्राद्वारे सुरू असलेल्या बोगद्याचे शंभर मीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर या यंत्राच्या मदतीने तब्बल ४७ कंकणाकृती कडादेखील उभारण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या स्वरुपातील सात कंकणाकृती कडांची उभारणी करण्यात आली आहे. 

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेतर्फे १०.५८ किमीचा कोस्टल रोड तयार केला जात आहे. या साठी ११ जानेवारीपासून बोगदे खणण्यास सुरुवात झाली. प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राइव्ह) ‘छोटा चौपाटी’पर्यंत या बोगद्याचे काम केले जाईल. हे बोगदे मलबार हिलच्या खालून जातील. 

या बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.७ किमी आहे.  खोदकामास ‘मावळा’ हे ‘टनेल बोअरिंग मशीन’ वापरले जात आहे. या यंत्राने दीड महिन्यांत शंभर मीटर बोगदा खणण्याचे काम केले. दोन्ही बोगद्यांसाठी २० महिन्यांचा कालावधी लागेल. खोदकाम जमिनीखाली १०  ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.

असा असणार बोगदाnदोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.०७ किलोमीटर एवढी आहे. तसेच खणण्यात येत असलेल्या दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी १२.१९ मीटर असणार आहे. या बोगद्यांना वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तर असणार आहे. ज्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असेल.