मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर मालेगाव शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी चार नगरसेवकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षांतराचा हा कार्यक्रम राष्ट्रवादी भवनात झाला. मौलाना मुफ्ती हे 2क्क्9च्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षातर्फे निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे शेख रशीद यांचा पराभव केला होता. ही जागा आता मौलाना मुफ्ती यांच्यासाठी राष्ट्रवादीला द्या, अशी मागणी काँग्रेसकडे केली जाणार आहे. सुनील गायकवाड यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली जाईल.
आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोटय़ात आहे. तेथे शिवसेनेचे दादा भुसे आमदार आहेत. मौलाना मुफ्ती आणि सुनील गायकवाड यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी मजबूत होईल, असे भुजबळ म्हणाले. विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वबळावर लढावे म्हणजे कोणाची किती ताकद आहे ते कळेल, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
12 नगरसेवकांची
वेगळी चूल
आ. मौलाना मुफ्ती यांच्या नेतृत्वात मालेगाव महापालिकेतील 24 नगरसेवक येत्या तीन चार दिवसांत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील आणि त्याचा मोठा कार्यक्रम मालेगाव येथे होईल, असे सुनील तटकरे यांनी पत्र परिषदेत सांगितले. मात्र, मौलाना मुफ्ती यांच्या समर्थक 12 नगरसेवकांनी सायंकाळी मालेगावमध्ये पत्र परिषद घेऊन आपण राष्ट्रवादीत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. आमचा स्वतंत्र गट राहील, असे ते म्हणाले.
माजी महापौर राष्ट्रवादीत
ठाणो येथील माजी महापौर काँग्रेसचे नईम खान यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ते मुंब्रा भागातील आहेत. त्यांच्या प्रवेशाने जितेंद्र आव्हाड यांना बळ मिळाले आहे.