नवी मुंबई : प्रलंबित मागण्यांसाठी ४ जून रोजी थेट विधानभवनावर धडक देण्याचा इशारा माथाडी कामगारांनी दिला आहे. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ मे रोजी तीव्र आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने म्हणावी तशी दखल न घेतल्याने आता थेट विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा माथाडींचे नेते आमदार नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. महाराष्टÑ राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून २८ मे रोजी काम बंदचे आंदोलन करण्यात आले होते. माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. परंतु शासन त्याकडे लक्ष देत नसल्याचे युनियनचे म्हणणे आहे. त्यानुसार प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी २८ मे रोजी माथाडी कामगारांनी एक दिवस काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर मुुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आश्वासन देण्यात आले होते. आश्वासनानंतरही ही बैठक न होऊ शकल्याचा संताप आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. ही बैठक होऊ न शकल्याने ४ जून रोजी माथाडी कामगार विधानभवनावर धडक देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
माथाडी कामगार विधानभवनावर धडकणार
By admin | Updated: June 2, 2014 04:12 IST