Join us

माथाडी भवन उद्यानाची दुरवस्था

By admin | Updated: August 2, 2014 01:41 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील माथाडी भवन उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी दलदल तयार झाली असून संघटनेकडून उद्यानाची योग्य देखभाल केली जात नाही.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील माथाडी भवन उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी दलदल तयार झाली असून संघटनेकडून उद्यानाची योग्य देखभाल केली जात नाही. या जागेवर गॅरेज चालकानेही अतिक्रमण केले आहे.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनचे मुख्य कार्यालय एपीएमसी परिसरात उभारण्यात आले आहे. माथाडी भवनची वास्तू तयार झाल्यानंतर संघटनेने शेजारी उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील भूखंड सिडकोकडून सुशोभीकरणासाठी ताब्यात घेतला. या ठिकाणी माथाडी भवन उद्यान विकसित करण्यात आले. भूखंडाला कुंपण घालून हिरवळ तयार केली व काही वृक्षही लावण्यात आले. ९ एप्रिल २००६ ला संघटनेचे तत्कालीन सरचिटणीस संभाजीराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. काही दिवस व्यवस्थित देखभाल केल्यानंतर संघटनेच्या नेत्यांनी उद्यानाच्या गेटला कुलूप लावून ठेवले आहे. सद्यस्थितीमध्ये पावसामुळे हिरवळ तयारी झाली आहे. परंतू देखभाल होत नसल्यामुळे दलदल तयार झाली आहे. माथाडी भवन इमारतीच्या मागील बाजूला गॅरेज सुरू करण्यात आले आहे. माथाडी संघटना पुरस्कृत हे गॅरेज आहे. वास्तविक विद्युतगृहासाठी बांधण्यात आलेल्या खोलीच्या बाहेर हे गॅरेज थाटण्यात आले आहे. गॅरेजच्या बाजूला उद्यानाची भिंत पाडून टाकली आहे. गॅरेजमधील व इतर वाहने उद्यानाच्या जागेवर उभी केली जात आहेत. या सर्व प्रकाराकडे संघटनेचे पदाधिकारी दुर्लक्ष करू लागले आहेत. सिडकोकडून सुशोभीकरणासाठी जागा घेवून प्रत्यक्षात त्याचा दुरूपयोग केला जात आहे. माथाडी कामगारांनीही याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.