Join us

पेण मतदारसंघात अटीतटीचा सामना

By admin | Updated: October 10, 2014 23:12 IST

विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष आपापले राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जोरदार राजकीय चढाया करीत आहेत

पेण : विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष आपापले राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जोरदार राजकीय चढाया करीत आहेत. मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने आॅक्टोबर हीटचे चटके खात प्रचार करताना दमछाक होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांपैकी पाच उमेदवार तगडे स्पर्धक असल्याने सामना पंचरंगी रंगण्याची शक्यता आहे. १९१ पेण, पाली, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८१ हजार ६४३ मतदारसंख्या असून यामध्ये १ लाख ३८ हजार ७६ महिला मतदार तर १ लाख ४३ हजार ५६७ पुरुष मतदार आहेत. पेण तालुका व शहरांची १ लाख ५९ हजार ५००, सुधागड-पाली तालुक्यात ५७ हजार २३३ तर रोहा तालुक्यात ६४ हजार ९१० अशी मतदारांची संख्या विभागली असून राजकीय पक्षाचे बलाबल पाहता शेकापकडे २ जिल्हा परिषद मतदारसंघ, पेण पंचायत समितीसह पाली पं.स. अशी राजकीय ताकद आहे. काँग्रेसकडे पेण नगरपरिषदेसह रावे जि.प. मतदारसंघ, शिवसेनेकडे वडखळ झोतीरपाडा जि.प. मतदारसंघ तर राष्ट्रवादीकडे ३ जि.प. मतदारसंघ खांब असे राजकीय बलाबल आहे. भाजपा व मनसेकडे आतापर्यंत संग्रही असलेली मते रेकॉर्डवर नसल्याने त्यांच्या जमापुंजीचा हिशोब या निवडणूक निकालात दिसणार आहे. या ठिकाणी पूर्वी असलेल्या युत्या, आघाड्यांचे समीकरणे तुटल्याने प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या खात्यात किती मतदारांचे अकाऊंट जमा होणार या राजकीय ईर्षेने सध्या प्रचारात पेटलेला आहे. पेण तालुका व शहराची राजकीय परिस्थिती पाहता इथे पारंपरिक शेकाप-काँग्रेसच्या राजकीय अस्तित्वात आता शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी या प्रमुख राजकीय पक्षांकडे किती मतदारांचा पाठिंंबा मिळतो, यावर येथील विद्यमान शेकाप आ. धैर्यशील पाटील व काँग्रेसचे रविशेठ पाटील यांच्या मतांचे विभाजन होणार आहे तर पाली-सुधागडमध्ये शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांवर शिवसेना, काँग्रेस, भाजपा, मनसे हल्ला चढवतील.