Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र आरक्षणासाठी मातंग समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 03:07 IST

अनुसूचित जातीमध्ये मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण देण्याची मागणी करत अखिल भारतीय मातंग संघ आणि भारतीय बहुजन आघाडी या संघटनांनी संयुक्तरित्या सोमवारी

मुंबई : अनुसूचित जातीमध्ये मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण देण्याची मागणी करत अखिल भारतीय मातंग संघ आणि भारतीय बहुजन आघाडी या संघटनांनी संयुक्तरित्या सोमवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. या मोर्चाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. त्यात मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा मातंग समाजाच्या नेत्या कुसुम गोपले यांनी केला आहे.कुसुम गोपले म्हणाल्या की, नुकतेच मातंग समाजाचे नेते क्रांतीवीर बाबासाहेब गोपले यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या निधनानंतर खचून न जाता समाजाने धडक मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र आरक्षणाची आठवण करून दिली. सायंकाळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून मातंग समाजाच्या स्वतंत्र ८ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय शेवटच्या श्वासापर्यंत मातंग समाजासाठी लढणाऱ्या बाबासाहेब गोपले यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईत उभारण्याचे मान्य केले. शासनाने अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण द्यावी, अशी मातंग समाजाची मागणी आहे. या मागणीसोबत भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे दोन हजार कोटी भाग भांडवल वाढवावे, या मागण्यांवरही मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. (प्रतिनिधी)