Join us

मास्टरमाइंड डॉक्टर त्रिपाठीची जामिनासाठी कोर्टात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील बनावट लसीकरण प्रकरण; दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज दाखललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवलीतील हिरानंदानी साेसायटी ...

कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील बनावट लसीकरण प्रकरण; दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदिवलीतील हिरानंदानी साेसायटी येथील बोगस लसीकरणातील मास्टरमाइंड डॉ. मनीष त्रिपाठी याने जामिनासाठी दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. या प्रकरणात माझ्या आशिलाच कोणताही सहभाग नसून त्यांना बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचा दावा त्याचे वकील ॲड. आदिल खत्री यांनी मंगळवारी केला.

मुख्य आरोपी डॉ. त्रिपाठी याचे वकील ॲड. खत्री यांच्या म्हणण्यानुसार, लसीकरण शिबिर आयोजित करताना स्थानिक पालिका विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र कांदिवलीतील हिरानंदानी हेरीटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी लसीकरण शिबिरासाठी सोसायटीने ती घेतलीच नाही. तसेच माझे अशील डॉ. त्रिपाठी यांची तक्रारदाराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भेट झालेली नाही. चारकोपच्या शिवम रुग्णालयाला वाचविण्यासाठी त्याचा कर्मचारी महेंद्र सिंह याने सोसायटीची दिशाभूल केल्याने हा गोंधळ झाला असून, यात डॉ. त्रिपाठीला बळीचा बकरा केला जात आहे. हे संपूर्ण प्रकरण शिवम हॉस्पिटल, त्याचे मालक व त्यांचा मुलगा याभोवती फिरत असून, कांदिवली पोलीस राजकीयदृष्ट्या बलाढ्य असलेल्या शिवम हॉस्पिटलचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत असेही ॲड. खत्री यांचे म्हणणे आहे.

शिवम रुग्णालयाने पोलीस किंवा पालिकेकडे लसी गहाळ होण्याबाबत तक्रार केली नाही. तसेच त्यांच्या कोविन नोंदणीवर अवैध प्रवेश करण्याचा किंवा कोविन ॲपकडून ओटीपी घेण्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला नाही. अधिकृत प्रवेश असलेल्या अधिकृत व्यक्तीने म्हणजेच डॉ. पाटरिया आणि त्यांच्या प्रशासनाने त्यांच्या सीव्हीसीचा गैरवापर केला आहे. लसीकरण आयोजित करण्यासाठी बीएमसीचे एक सीव्हीसी अधिकृत केंद्र आहे. डॉ. त्रिपाठीकडे सीव्हीसी नाही, मग तो या लसींचा गैरवापर कसा करू शकतो? कारण पालिका फक्त शिवम हॉस्पिटलसारख्या अधिकृत सीव्हीसी केंद्रांना लसींचे वाटप करते, असे म्हणत ॲड. खत्री यांनी मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात डॉ. त्रिपाठींचा जामीनअर्ज दाखल केला. पोलिसांना तपासात डॉ. त्रिपाठी सर्वतोपरी साहाय्य करणार असून त्यांचा पासपोर्ट ते वर्ग करण्यास तयार असल्याचे ॲड. खत्री यांनी अर्जात नमूद केले आहे.

* सुनावणी २५ जून राेजी

कांदिवली पोलिसांना डॉ. त्रिपाठींच्या वकिलाने केलेल्या आरोपांबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी डॉ त्रिपाठींच्या अटकेनंतरच सत्य सर्वांच्या समोर येईल, असे सांगितले. दिंडोशी सत्र न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २५ जून रोजी ठेवली आहे.

.............................