Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला नकार दिला, म्हणून प्रेयसीला ठरविले अतिरेकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 06:20 IST

पसरविली बॉम्बची अफवा; आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६ तास अ‍ॅलर्ट

मुंबई : ‘येमेनच्या महिला प्रवाशाच्या बॅगेत बॉम्ब आहे. ती अतिरेकी आहे.’ या कॉलने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी खळबळ उडाली. हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला. सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम सुरू केली. तरुणीला ताब्यात घेत चौकशी केली. ६ तासांच्या शोधकार्यात हाती काहीच लागले नाही. अखेर कॉलधारकालाच पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा येमेनच्या तरुणीने लग्नाला नकार दिला,े म्हणून तिला धडा शिकविण्यासाठी त्याने हा कॉल केल्याचे चौकशीत समोर आले. कुतुबुद्दिन साईवाला (२९) असे प्रतापी तरुणाचे नाव असून, त्याला सहार पोलिसांनी अटक केली आहे.मूळची येमेनची रहिवासी असलेल्या २७ वर्षीय तरुणीची मुंबईत कामानिमित्त ये-जा असते. १५ दिवसांपूर्वी मैत्रिणीच्या लग्नासाठी ती औरंगाबादला आली होती. याच दरम्यान तिची साईवालासोबत ओळख झाली. सयानीने तो व्यावसायिक असल्याचे भासविले. तिच्याशी संवाद वाढविला. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सयानीने तिला लग्नाची मागणी घातली. मुलगा उच्चशिक्षित, तसेच स्वत:चा व्यवसाय असल्याने तिने याबाबत वडिलांना सांगितले. वडिलांनी मुलाचीकुंडली काढण्यास सुरुवात केली. तेव्हा तो हार्डवेअरचे काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. म्हणून मुलीने त्याला नकार दिला.शनिवारी ती आंतराष्ट्रीय विमानतळावरून घरी जाण्यास निघाली. त्याच दरम्यान, तरुणीला धडा शिकविण्यासाठी त्याने पोलिसांना कॉल करून येमेनच्या महिला प्रवासीच्या बॅगेत बॉम्ब असून, ती अतिरेकी असल्याची माहिती दिली. या कॉलमुळे विमानतळावर हायअ‍ॅलर्टे जारी करण्यात आला.सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम सुरू केली. ६ तासांचे शोधकार्य करूनही हाती काहीच लागले नाही. अखेर, खार पोलिसांनी फोन आलेल्या क्रमांकावरून शोध सुरू केला. साईवालाने त्याच्याच मोबाइल क्रमांकावरून कॉल केला होता. त्याच्या लोकेशनवरून त्याला ताब्यात घेतले, तेव्हा वरील घटनाक्रम उघडकीस आला. त्याने प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे सहार पोलिसांना सांगितले.

टॅग्स :मुंबईदहशतवादीविमानतळ