Join us  

लग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 5:13 AM

बॅँक व्यवस्थापक महिलेची फसवणूक

- मनीषा म्हात्रे मुंबई : वयाच्या ४१व्या वर्षी विवाह संकेतस्थळावर वराचा शोध सुरू असतानाच, एका तरुणासोबत ओळख झाली. पहिल्या भेटीतच तो आवडला. लग्नाची बोलणी सुरू झाली. बोलणीदरम्यान विविध कारणे पुढे करत, तिच्यासह तिच्या भावोजींकडून त्याने तब्बल ४० लाख रुपये उकळले. पैसे हातात पडताच, लग्नाआधीच तो नॉट रिचेबल झाल्योची घटना वर्सोव्यातील एका नामांकित बँकेच्या शाखा व्यवस्थापक महिलेसोबत घडली. तिने या प्रकरणी वर्सोवा पोलिसांत सावन देसाई नावाच्या ठगाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

अंधेरी परिसरात राहणारी ४१ वर्षीय सुनीता (नावात बदल) ही ठाण्यातील एका नामांकित बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. कामाच्या धावपळीत स्वत:कडे तिने दुर्लक्ष झाले. वय उलटून जात असल्याने, घरच्यांच्या आग्रहाखातर २०१६ मध्ये विवाह संकेतस्थळावर तिने नोंदणी केली. याच संकेतस्थळावरून सावन विमलकांत देसाई नावाच्या ठगाने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिनेही होकार देत भेटीसाठी तयारी दाखविली. त्यानुसार, २३ जुलै रोजी दोघांची दादरमध्ये भेट ठरली. तेथे देसाईने तो पुण्यातील कंपनीत नोकरीला असल्याचे सांगितले. पहिल्या भेटीतच तो सुनीताला आवडला. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

२८ आॅगस्ट,े २०१६ रोजी सावन याने सुनीताच्या घरी येऊन तिच्या आईवडिलांची भेट घेतली. लग्नाविषयी चर्चा केली. आईवडिलांनीही दोघांच्या लग्नाला ग्रीन सिग्नल दिला. सुनीताने त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न रंगविले. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या.

सुरुवातीला पनवेलमध्ये घर घ्यायचे असल्याचे सांगून त्याने सुनीता यांच्याकडे पैशांची मदत मागितली. तिने घर दाखविण्याबाबत सांगताच, तिला सरप्राइज असल्याचे सांगून घराची चावी तुझ्याच हातात देणार असल्याचे सांगून त्याने गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला.

तिने घर घेण्यासाठी कर्ज काढले. सुरुवातीला १४ लाख रुपये त्याला दिले. त्यानंतर आई आजारी आहे, स्वत:चा अपघात झाला, असे सांगत डिसेंबर २०१७ पर्यंत त्याने तिच्याकडून एकूण २८ लाख ३५ हजार रुपये उकळले.

अखेर मे, २०१८ मध्ये लग्न करण्याचे ठरले. तो नातेवाइकांसह येणार असल्याने कुटुंबीयांनी तयारीला सुरुवात केली. मात्र,े तो आलाच नाही. पुढे त्याने मोबाइलही बंद केला.

टॅग्स :चोरीमुंबई