Join us

संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारपेठांना बहर

By admin | Updated: January 11, 2015 01:07 IST

आर्थिक मंदी असो किंवा पैशांची चांदी सण-उत्सव दणक्यात साजरा करण्यावर सगळ्यांचाच भर असतो

सायली पाटील ल्ल मुंबईआर्थिक मंदी असो किंवा पैशांची चांदी सण-उत्सव दणक्यात साजरा करण्यावर सगळ्यांचाच भर असतो. त्यातही मकरसंक्रांत म्हटलं की भोगी, संक्रांत, किंक्रांत, तीळगूळ असे शब्द या पंधरवड्यात सतत आपल्या कानावर अगदी हमखास पडतातच. चार दिवसांवर संक्रांत आल्याने शहरातल्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. मकरसंक्रांतीच्या या पर्वावर दादर, लालबाग, भोईवाडा, परळ अशा सर्व बाजारपेठा ग्राहकांनी अगदी खुलून गेल्या आहेत. दादरच्या बाजारपेठेत गर्दी पाहावयास मिळतेय. दुकानदारांच्या मते, गिरणगावातील कामगार कुटुंबांचे स्थलांतर आणि विभक्त कुटुंबपद्धतीचा परिणाम गिरणगावातील गणेशोत्सव वगळता इतर उत्सवांवर होताना दिसतो. लालबाग, दादर अशा बाजारपेठांमध्ये तिळाचे लाडू आणि तीळगुळाचे दर यंदा काहीशा प्रमाणात (१६० ते २०० रुपये प्रतिकिलो) वाढल्याची कुरकुर ग्राहकवर्गात आहे. पण गृहिणींकडे जसे सर्व प्रश्नांवर उपाय असतात तसेच वाढलेल्या दरांवर उपाय म्हणून भावात घासाघीस केली जात असल्याचे बाजारपेठांमध्ये दिसून आले. दादरमधल्या सौभाग्य, महिला वस्तू भांडार आणि इतर दुकानांमध्ये ‘हलव्याचे दागिने’ घेण्यासाठी महिलांची एकच गर्दी दिसली. संक्रांतीला हळदी-कुंकू समारंभात वाण म्हणून देण्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक वस्तू बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. याआधी वाण म्हणून काय काय वाटले, ते आठवून यंदा नवी आणि सर्वांना उपयोगी पडावी अशी वस्तू द्यावी, या विचाराने महिलावर्ग बाजारहाट करताना दिसल्या. या सर्वात अ‍ॅक्रेलिकच्या हळदी-कुंकवाच्या सुरेख कुयऱ्या, विविधरंगी कुंदन लावलेले हळदी-कुंकू पात्र या वस्तूंना यंदा महिलावर्गाची पसंती दिसली.