डोंबिवली : नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला निवडून आणण्यात अपयश आल्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वंडार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वंडार पाटील यांच्याकडे होती. परंतु, ऐनवेळी विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच एकाला बंडखोर म्हणून उमेदवारी देऊन साथ दिली आणि तो निवडून आला. निवडणूक निकालानंतर आता ते सर्व एकत्र येऊन पराभवाचे खापर फोडण्यासाठी पाटील यांच्या सभापतीपदासंदर्भात अविश्वास आणणार असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे त्यांनी स्वत:हून या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे सुपूर्द केला.या राजीनामा नाट्यामुळे जिल्हाभर टीडीसी बँकेच्या राजकारणाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे. त्या बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व आले आणि कधी नव्हे ती राष्ट्रवादीची मोठी पडझड झाली. पाटील हे चार वर्षे कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे सभापती म्हणून निवडून गेले आहेत. त्यांच्या कार्यकालात त्यांनी या दुर्लक्षित समितीचा कारभार सुधारण्यासह पडीक जागेलाही संजीवनी देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा ते करतात. आजमितीस या समितीची उलाढाल सात कोटींच्या घरात असून तेथे भाजी, अन्नधान्य विके्रते आदी व्यावसायिकांचा मोठा व्यवसाय आहे. त्यांना समितीने आत्मविश्वास निर्माण करून दिला. परिणामी, शेतकऱ्यांनाही नफा मिळू लागला. तसेच होलसेलपासून किरकोळ विक्रेत्यांनाही त्या ठिकाणी व्यवसायाची संधी मिळाल्याचे ते सांगतात. समितीचा सर्वांगीण विकास होत असतानाच सहकारी नाराज असतील तर ते योग्य नाही. टीडीसी निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जीवाचे रान केले, परंतु त्यात यश मात्र आले नाही. त्यावर विरोधकांसह सर्वांनी एकत्र येऊन माझ्या सभापतीपदासंदर्भात अविश्वास आणण्यासाठी कंबर कसल्याची कुणकुण मला लागली. अशा कुरघोडीच्या राजकारणामुळे मी व्यथित झालो. कोणीतरी केवळ या ‘पदा’साठी राजकारण करण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वत:हूनच राजीनामा देऊन हे पद रिक्त केल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बाजार समिती सभापतीपदाचा वंडार पाटील यांचा राजीनामा
By admin | Updated: May 14, 2015 22:48 IST