Join us

नेरूळमधील मार्केटच्या भूखंडाचे राजकारण

By admin | Updated: January 22, 2015 01:12 IST

नेरूळ सेक्टर २० मध्ये मार्केट बांधण्याच्या प्रस्तावावरून काँगे्रस व राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २० मध्ये मार्केट बांधण्याच्या प्रस्तावावरून काँगे्रस व राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर सदर जागा सांस्कृतिक मैदानासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेऊन मूळ प्रस्ताव रद्द करण्यात आला. या भूखंडावरून राजकारण सुरू झाले असून हा वाद न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील भूखंड क्रमांक १६ वर दैनंदिन बाजार विकसित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेसाठी आला होता. यापूर्वीही हा प्रस्ताव महासभेत आला होता. परंतु सद्यस्थितीमध्ये बांचोली मैदान म्हणून या भूखंडाचा वापर सुरू आहे. या ठिकाणी पारंपरिक होळी सण साजरा केला जात असल्याचे कारण सांगून तो रद्द करण्यात आला होता. यावेळी पुन्हा प्रस्ताव मंजुरीला आल्यानंतर काँगे्रस नगरसेवक नामदेव भगत यांनी या परिसरात मार्केटची गरज असून ज्या उद्देशासाठी हा भूखंड राखीव आहे त्यासाठी त्याचा वापर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. नगरसेवक सूरज पाटील यांनी या ठिकाणी मैदान हवे अशी नागरिकांची अपेक्षा असल्याचे सांगितले. महापौर सागर नाईक यांनीही ग्रामस्थांनी पत्र दिले असून या जागेस सांस्कृतिक परंपरा असल्यामुळे मार्केटच्या ऐवजी सांस्कृतिक मैदानासाठी सदर भूखंड राखून ठेवण्यासाठीची उपसूचना मांडण्यास सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मार्केट रद्द करण्याच्या बाजूने मतदान केले तर शिवसेना व काँगे्रसच्या नगरसेवकांनी मार्केटच्या बाजूने मतदान केले. बहुमताने मार्केट बांधण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. या प्रस्तावावरून नामदेव भगत, महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज पाटील यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पाटील व महापौर यांनी रहिवाशांनी मैदान हवे अशी मागणी केल्याचे स्पष्ट केले. भगत यांनी मात्र तुमच्या गावांमध्ये मार्केट झाले पाहिजे. ज्यासाठी आरक्षण आहे त्यासाठी भूखंडाचा वापर झाला पाहिजे व आमच्या गावात मार्केट नको का, आमच्या कामांमध्ये तुम्ही का ढवळाढवळ करता असे सुनावले. चुकीच्या पद्धतीने व बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेणार असाल तर आम्हाला उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल. भविष्यात यामुळे चुकीचा पायंडा पडणार असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महासभेत दुसऱ्यांदा हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेनंतर सोशल मीडियातूनही पडसाद उमटत होते. मैदान हवे असलेल्या तरुणांनी महापौर व सूरज पाटील यांचे आभार मानले आहेत. मार्केटच्या भूखंडाचे राजकारण यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून पुढील प्रस्ताव येईपर्यंत तरी तेथे मैदानच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)महापौर सागर नाईक यांच्या बोनकोडे गावातील स्मशानभूमीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आला होता. शिवसेनेच्या मनोज हळदणकर यांनी या प्रस्तावामधील काही त्रुटी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु महापौरांनी त्यांना थांबवून आमच्या गावातील काम आम्ही पाहू, तुम्ही सांगू नका, असे सांगितले. हळदणकर यांनी विनंती करूनही त्यांच्या सूचना विचारात घेतल्या नाहीत. दुसरीकडे नेरूळ गावातील मार्केटच्या प्रस्तावावर मात्र त्यांनी व त्यांच्या पक्षातील नगरसेवकांनी हस्तक्षेप केला. यावेळी महापौर दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका नामदेव भगत यांनी केली. तुमच्या गावात कोणाचा हस्तक्षेप तुम्हाला नको मग आमच्या गावातील कामामध्ये का ढवळाढवळ करता, गावात येवून येथे विकास होत नसल्याचे सांगायचे व दुसरीकडे मार्केटच्या कामास विरोध करायचा. स्वत:च्या पक्षातील लोकांना पाठीशी घालण्यासाठी चुकीचा निर्णय घेतला जात असून याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट केले.राष्ट्रवादी नगरसेवकाचा घरचा आहेरनेरूळमधील मार्केटचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी मतदान घेण्यात आले. राष्ट्रवादी काँगे्रसने प्रस्ताव रद्द करण्यासाठी व तेथे सांस्कृतिक मैदान असावे या बाजूने मतदान केले. परंतु पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील यांनी मात्र हात वर केला नाही. यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले असून सत्ताधाऱ्यांना हा घरचा आहेर असल्याचे बोलले जात आहे.