Join us
Daily Top 2Weekly Top 5

सागरी सुरक्षेचा प्रश्न मिटणार!

By admin | Updated: June 30, 2015 01:13 IST

सीआरझेड व सॉल्ट कमिशनर यांच्या परवानगीअभावी बांधकाम रखडलेल्या कोकण परिक्षेत्रातील सागरी पोलीस ठाण्यांचा प्रश्न लवकरच मिटणार आहे.

नवी मुंबई : सीआरझेड व सॉल्ट कमिशनर यांच्या परवानगीअभावी बांधकाम रखडलेल्या कोकण परिक्षेत्रातील सागरी पोलीस ठाण्यांचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. याकरिता संबंधित यंत्रणेची मंत्रालय स्तरावर बैठक घेतली जाणार असल्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. कोकण परिक्षेत्रातील पोलीस यंत्रणेच्या बैठकीअंती पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.संपूर्ण महाराष्ट्राला ७२० कि.मी. चा सागरी किनारा लाभला असून त्यापैकी ६०३ कि.मी. चा सागर किनारा कोकण परिक्षेत्रात येतो. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात सागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेसाठी सागरी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परंतु कोकण परिक्षेत्रातील ३६ पैकी ७ सागरी पोलीस ठाण्यांसाठी स्वत:ची जागा नसल्याने ते भाडोत्री जागेत आहेत. सीआरझेड क्षेत्रात पोलीस ठाणे बांधण्याकरिता परवानगीचा शासनाच्या परिपत्रकात नियम असतानाही पर्यावरण विभाग व सॉल्ट कमिशनच्या परवानगीअभावी त्या पोलीस ठाण्याचे बांधकाम करता आलेले नाही. त्याचा सागरी सुरक्षेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी दोनही प्रशासनाची मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. कोकण परिक्षेत्रातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सीबीडी येथे बैठक झाली. या बैठकीअंती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी पोलीस आयुक्त प्रभात रंजन, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्यासह पाच जिल्ह्णांचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी आॅक्टोबर महिन्यात १२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. यावेळी भार्इंदर, मुरबाड, रत्नागिरी, पालघर, वसई परिसरात नव्या पोलीस ठाण्यांची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. वसई, माणगाव, रत्नागिरी इथल्या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नवी उपअधीक्षक पदे तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचीही माहिती त्यांनी दिली. कुंभमेळ्यासाठी मुंबईकडून जाणाऱ्या भाविकांचीही संख्या अधिक आहे. (प्रतिनिधी)