Join us

सागरी मार्गाने गावठी दारु

By admin | Updated: May 31, 2014 01:07 IST

महिन्याभरापूर्वीच वसईतील रानगाव येथे काळ्या गुळाची वाहतूक करणारी जीप पोलिसांच्या हाती लागली असतानाच अन्य एका कारवाईत गावठी दारु जप्त करण्यात आली आहे

नायगाव : महिन्याभरापूर्वीच वसईतील रानगाव येथे काळ्या गुळाची वाहतूक करणारी जीप पोलिसांच्या हाती लागली असतानाच अन्य एका कारवाईत गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. अर्नाळा किल्ला येथून सागरी मार्गाने रात्रीच्यावेळी ही दारु रानगाव किनार्‍यावर उतरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली, तर वाहतूक करणारा बोटीसह फरार झाला आहे. विक्रम नारायण वैती (२५, रा. ब्रह्मपाडा, भुईगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी रात्री ८.३0 ते ९ च्या सुमारास रानगाव किनार्‍यावर अशा स्वरुपाची गावठी दारु येणार असल्याची माहिती मिळाल्याने प्रभारी अधिकारी महेश्वर रेड्डी यांसह इतर कर्मचारी या भागात दाखल झाले. अर्नाळा येथून बोटीने ही दारु आणणारा प्रदीप म्हात्रे याने कॅन किनार्‍यावर उतरवले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. एकूण ८ कॅनमध्ये २८0 लीटरची गावठी दारु पोलिसांनी जप्त केली. त्याची किंमत १४ हजार एवढी आहे. वसई पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वराडकर करीत आहेत. जलवाहतूक सोयीस्कर वसई पोलिसांनी केलेल्या कारवाईचा धसका गावठी दारु भट्ट्यांच्या मालकांनी घेतल्याने वसई पश्चिमेत अशा वाहतुकीसाठी जलवाहतूक सोयीस्कर पडते. रात्रीच्यावेळी या भागात गावठी दारु पोहोचवण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा. कळंब, रानगाव, राजोडी, भुईगाव या भागात अर्नाळा किल्ल्यातून दारु वितरित केली जायची. भरतीमुळे आता भुईगाव किनार्‍यावर हा मार्ग बंद झाला आहे, त्यामुळे गावठी दारु आणण्यासाठी मुख्य रस्त्यावरुन ने - आण केली जायची, मात्र पोलिसांच्या भीतीने रस्त्यावरुन वाहतूक बंद करुन जलमार्गाने ही वाहतूक सुरु झाली. सुरक्षित व सोयीस्कर असल्याने मागील काही दिवसांपासून ही वाहतूक वाढली होती, मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले असून त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)