नवी मुंबई : सीबीडी बेलापूरमध्ये ६३०० चौरस मीटर भूखंडावर उद्यान व ९८०० चौरस मीटरवर फूड प्लाझा असा ‘मरिना’ प्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. येथील सेक्टर ११, १४ व १५ मध्ये खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. या ठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण सिडकोने हटविले आहे. पुन्हा तेथे अतिक्रमण होवू नये यासाठी तेथे पर्यटनस्थळ विकसित करण्यात यावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोकडे केली होती. नवी मुंबईकरांना विरंगुळ्यासाठी चांगली ठिकाणे खूपच कमी आहेत. या परिसराचा विकास केल्यास शहरातील सर्वात चांगले पर्यटनस्थळ विकसित होवू शकते असे त्यांनी सुचविले होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी या परिसरात ‘मरिना’ प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पाचा आराखडाही तयार करण्यात आला असून गुरुवारी मंदा म्हात्रे व सिडको अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. येथील वॉटर फं्रट परिसर १.८ किलोमीटर अंतराचा आहे. चार भागामध्ये हा परिसर विभागला आहे. यामध्ये मरिना उद्यान, वॉटर रिक्रीएशन, प्लाझा, स्केटिंग रिंग, खेळण्यासाठी मैदान, खारफुटीचा परिसर, दिवाळे गाव सेक्टर ११ मधील प्र्रोमोनेडचा समावेश आहे. या चार प्रकारच्या गोष्टींना एकत्र करणारा वॉटर फं्रंट वॉकवे तयार केला जाणार आहे. वॉटर फं्रट वॉकवेमध्ये जमिनीवर चालण्यासाठी बनवण्यात आलेला रस्ता, पाण्यावर बांधण्यात आलेला पूल, खारफुटीपाशी बनविण्यात आलेला बोर्डवे आणि सेक्टर ११ मध्ये प्रामोनेडचा समावेश असणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डला ४ हजार चौरस मीटरचा परिसर द्यायचा आहे. पहिल्या टप्प्यात १६०० चौरस मीटर तर दुसऱ्या टप्प्यात २४०० चौरस मीटर परिसर देण्यात येणार आहे. एमएमबीच्यावतीने या परिसरामध्ये पर्यवेक्षक, कार्यालय, फ्युएल पंपिंग स्टेशन, लोडिंग अनलोडिंग यासारख्या आधारभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे २५ बोटींसाठी तरंगते तराफे बनवण्यात येणार आहेत. या ठिकाणी ६३०० चौरस मीटरवर उद्यान विकसित केले जाणार आहे. ४० व्यक्ती एकावेळी सामावू शकतील अशा आकाराचे योगा शेड, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, स्वच्छतागृह, गझेबो आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी या ठिकाणी विकसित केल्या जाणार आहेत. ९८०० चौरस मीटरवर विस्तीर्ण फूड प्लाझा विकसित करण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये खाद्यपदार्थ स्टॉल असणार आहेत. याशिवाय ६० व्यक्ती बसू शकतील एवढ्या क्षमतेचे अॅम्पी थिएटर, प्लाझाच्या पुढील भागात मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदान व त्याच्या सभोवताली स्केटिंग रिंग बनविण्यात येणार आहे. ७६० लांबीच्या खारफुटीचा परिसर आतापर्यंत दुर्लक्षित राहिला असून तेथे वॉटर फ्रंट वॉकवे तयार केला जाणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर पडणार...सिडकोने आतापर्यंत सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, अर्बन हाट, एक्झिबिशन सेंटर, उत्सव चौक असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभारले आहेत. मरिना प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. याठिकाणी शहरातून व इतर ठिकाणावरूनही भेट देण्यासाठी नागरिक येवू शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सीबीडीमध्ये खाडीकिनारी बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला होता. येथे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. या प्रकल्पास ‘गोवर्धनी मरिना’ असे नाव देण्यात यावे. - मंदा म्हात्रे, आमदार
बेलापूरमध्ये सिडको साकारणार ‘मरिना’ प्रकल्प
By admin | Updated: August 27, 2015 23:57 IST