Join us

भूमिपुत्रांच्या लुटीच्या निषेधार्थ मार्क्सवाद्यांचा पालघरात मोर्चा

By admin | Updated: April 15, 2015 23:00 IST

गरीबाचे तथाकथित कैवारी यांच्या कचाट्यात भरडून निघत असल्याच्या निषेधार्थ आज कॉ. गोदावरी परुळेकर मार्क्सवादी विचार मंचच्या वतीने पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

पालघर : पालघर जिल्ह्यातील फॉरेस्ट फ्लॉट आणि सर्वसामान्य जनतेच्या जमीन, पाणी, रोजगार व विकासाच्या प्रश्नासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेने अंदाधुंद कारभार सुरू असून पालघर जिल्ह्यातील जनता एजंट आणि गरीबाचे तथाकथित कैवारी यांच्या कचाट्यात भरडून निघत असल्याच्या निषेधार्थ आज कॉ. गोदावरी परुळेकर मार्क्सवादी विचार मंचच्या वतीने पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.आज दुपारी पालघरच्या चार रत्यावरून हजारोच्या संख्येने मार्क्सवादी विचार मंचच्या कार्यक र्त्यांनी शासनाच्या नाकर्त्या भूमिकेविरोधात घोषणेबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कूच केली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर पोलीसांनी अडवला. यावेळी रामजी वरठा, कमा टबाले, परशुराम चव्हाण इ. ची भाषणे झाली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना दिलेल्या निवेदनात नव्या भूसंपादन कायद्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय तरतूदी रद्द करणे, परंपरागतरीत्या प्लॉट कसणाऱ्या स्थानिक बिगर आदिवासी शेतकऱ्यांना प्लॉट वाटप करणे, रेशनिंग धान्य वाटप व्यवस्थेत आमूलाग्र बदल करताना धान्य कोट्यात वाढ करणे, बड्या रहिवासी संकुलासाठी उभारण्यात येणारा दमण गंगा ते पिंजाळ लिंक प्रकल्प रद्द करा, घरगुती गॅस दरवाढ रद्द करा, आदिवासी घरकुल योजनेतील भ्रष्टाचार आळा घाला, पालघर जिल्ह्यात शासकीय स्तरावर अद्ययावत सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलची उभारणी करा, मौजे दादडे येथील पाणीपुरवठा योजना त्वरीत सुरू करा, नवापुर ते दांडी येथे दुपदरी वाहतुकीसाठी पुल उभारा, जिंदालचा नांदगाव बंदर प्रकल्प रद्द करा, तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यामुळे समुद्री पर्यावरणाला होणारा धोका टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करा, मौजे दापचरी येथील नियोजित पशु मास निर्मीती उद्योग रद्द करा, इ. मागण्या करण्यात आल्या होत्या. (वार्ताहर)