Join us

मणिभवनपासून पदयात्रा, काँग्रेसची गॅरंटी हिंदुस्थानचा आवाज: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 09:51 IST

पदयात्रा केल्यामुळे हिंदुस्थान जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचेही राहुल यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कन्याकुमारी ते काश्मीर चार हजार किलोमीटरची पदयात्रा केल्यामुळे हिंदुस्थान जवळून पाहण्याची संधी मिळाली. मी जो हिंदुस्थान समजत होतो त्यापेक्षा तो वेगळा असल्याचे या यात्रेतून समजले. भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले. त्यामुळे दुसऱ्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी देण्यात आली. ही गॅरंटी काँग्रेस पक्ष, मल्लिकार्जुन खरगे वा राहुल गांधींची नाही, तर तो हिंदुस्थानचा आवाज आहे, जनतेची मते विचारात घेऊन गॅरंटी दिलेली आहे, असे खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

रविवारी राहुल गांधी यांनी सकाळी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढली. या यात्रेत राहुल यांच्यासोबत महासचिव प्रियंका गांधी, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यासह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पदयात्रेनंतर न्याय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती.

‘हिंदुस्थान प्रेमाचा देश’

  • भारतीयांच्या डीएनएमध्येच आदर, प्रेम भरपूर आहे. हिंदुस्थान हा जगातील पहिला देश आहे, ज्याने स्वातंत्र्याची लढाई प्रेमाने लढली. 
  • दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याची प्रेरणा भारताकडून मिळाली, गांधीजींचे तत्त्वज्ञान व दिशा मिळाली, त्यातूनच दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले. 
  • हिंदुस्थान प्रेमाचा देश आहे तर त्यात द्वेष का पसरवला जातो? असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.
टॅग्स :राहुल गांधी