Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठीचा आता कानडीत ‘यू टर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 02:41 IST

महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमाप्रश्न सुटलेला नसला, तरी साहित्यासोबतच नाटकाने तो सोडवला आहे. ज्येष्ठ नाट्यलेखक आनंद म्हसवेकर यांच्या ‘यू टर्न’ या नाटकाने कन्नडमध्ये टर्न घेतला

- जान्हवी मोर्ये ल्ल डोंबिवली

महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमाप्रश्न सुटलेला नसला, तरी साहित्यासोबतच नाटकाने तो सोडवला आहे. ज्येष्ठ नाट्यलेखक आनंद म्हसवेकर यांच्या ‘यू टर्न’ या नाटकाने कन्नडमध्ये टर्न घेतला आहे. आतापर्यंत ‘यू टर्न’चे पाच भाषांत रूपांतर झाले असून कन्नडमुळे सहाव्या भाषेतील रसिकांपर्यंत ते पोहोचणार आहे. ‘यू टर्न’ हे प्रौढांच्या सहजीवनावर प्रकाश टाकणारे नाटक म्हसवेकर यांनी २००८ मध्ये लिहिले. तिच्या संहितेचे अनावरण कोल्हापुरात झाले. २००८ मध्ये मुंबईत प्रायोगिक रंगभूमीवर त्याचा पहिला प्रयोग झाला. कसदार कलाकारांच्या अभिनयासह म्हसवेकर यांच्या दमदार संहितेने रसिकांच्या मनाचा ताबा घेतला. नाटकाचे ५८५ प्रयोग झाले. विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले. समीक्षकांसह रसिकांनी ते डोक्यावर घेतले. त्याचे प्रवीण सोलंकी यांनी गुजरातीत रूपांतर केले. त्याचेही ११० प्रयोग झाले. नंतर, म्हसवेकर यांनीच हिंदी भाषेत त्याचे रूपांतर केले. हिंदीत त्याचे ५५ प्रयोग झाले. सिंधी भाषेत तीन प्रयोग झाले. कोकणी भाषेतही संहिता आली, पण अद्याप प्रयोग झालेला नाही. मणिपाल विद्यापीठातील डॉ. नीता इनामदार, सविता शास्त्री यांनी ‘यू टर्न’चे भाषांतर केले असून या संहितेचे प्रकाशन उडुपी येथे १ आॅगस्टला होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. विनोद भट यांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रकाशन सोहळ्यास म्हसवेकर यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. कन्नड साहित्यिक एस.एल. भैरप्पा यांची भाषक साहित्याची देवाणघेवाणीतून एका भाषेतून दुसऱ्या भाषेत झाली पाहिजे, हे त्यांचे वाक्य म्हसवेकर यांच्या मनावर परिणाम करून गेले. त्याचेच प्रत्यंतर नाट्यसंहिता प्रकाशनातून म्हसवेकर यांनी दिले. स्त्री-पुरुष संबंध हा गाभा‘यू टर्न’ हे नाटक स्त्री-पुरुष संबंधांवर आहे. भाषा दर फर्लांगावर बदलते. मात्र, नातेसंबंधातील भावना ही वैश्विक असते. तोच धागा या नाटकात पकडण्यात आला आहे. या नाटकातील नायक साठीचा आहे. त्याच्या घटस्फोटाचे प्रकरण सुरू आहे. नायिकेचा नवरा नाही. वृद्धापकाळात ते सहजीवनाचा आधार घेतात. नाटकात दोनच पात्रे आहे. ‘यू टर्न’ नाटकाने दोन पात्रांचा ट्रेण्ड पाडला आहे, याचेही समाधान म्हसवेकर यांना आहे.