Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माणूस नाटकवेडा आहे - उद्धव ठाकरे

By admin | Updated: August 2, 2014 02:30 IST

आजच्या धावपळीच्या जगात व्यक्तीला तणावमुक्त होण्यासाठी कलेची साथ लागते. कला ‘आॅक्सिजन’चे काम करतात. मराठी माणूस नाटकवेडा आहे

मुंबई : आजच्या धावपळीच्या जगात व्यक्तीला तणावमुक्त होण्यासाठी कलेची साथ लागते. कला ‘आॅक्सिजन’चे काम करतात. मराठी माणूस नाटकवेडा आहे. त्यामुळे दीनानाथ नाट्यगृह पुन्हा सुरू झाल्याने संपूर्ण मुंबईकरांसाठी आनंदाची बाब आहे, अशा भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. आज विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाट्यगृह तब्बल दोन वर्षांनी पुन्हा सुरू झाले. नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.मराठी रंगभूमीला फार जुना इतिहास लाभला आहे. याची ओळख मुंबईकरांना होण्यासाठी म्युझियम बांधावे अशी इच्छा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. रंगभूमीची वाटचाल दाखवणारे, त्याबद्दलची माहिती देणारे सचित्र असे म्युझियम उभारले पाहिजे. माझ्या आजोबांनी सामाजिक नाटके तयार केली. त्याकाळी त्यांना नाट्यगृह उपलब्ध होत नव्हती. मात्र जेव्हा त्यांच्या नावाचे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह उभारण्यात आले; त्यावेळी फार आनंद झाला, अशी आठवणही उद्धव यांनी यावेळी काढली. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह १९७८ साली बांधण्यात आले होते. त्यानंतर १९९६-९७ मध्ये त्यात किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. कालांतराने नाट्यगृहाची गरज बदलल्याने मे २०१२ मध्ये नाट्यगृहाची दुरुस्ती आणि नूतनीकरण सुरू झाले. आज तब्बल दोन वर्षांनी याचे नूतनीकरण होऊन आज लोकार्पण झाले. या वेळी महापौर सुनील प्रभू, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, रिपब्लिकन नेते अविनाश महातेकर, अशोक हंडे, श्रीधर फडके आदी उपस्थित होते.