Join us  

विधानभवनाच्या प्रांगणात साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 6:55 PM

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.  

मुंबई- कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.  यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत मराठी भाषा गौरव दिन येत असल्याने मराठी भाषा विभाग, मंत्रालय आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने विधिमंडळाच्या प्रांगणात मंगळवार, २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १०.०० वा. मराठी भाषा गौरव दिन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. विधान परिषदचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, विधान परिषदचे उपसभापती, मराठी भाषा मंत्री, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, मंत्री, राज्यमंत्री, दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, पुरस्कार प्राप्त मान्यवर साहित्यिक, पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन प्रांगणात हा कार्यक्रम साजरा होणार आहे. या प्रसंगी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक कौशल इनामदार व त्यांच्या सोबत असलेले विद्यार्थी मराठी अभिमान गीताचे सर्व मान्यवरांसमवेत समूह गायन करणार आहेत. या प्रसंगी प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये प्रथम क्रमांक पटकविलेला महाराष्ट्राचा चित्ररथ उद्या विधिमंडळाच्या आवारात आणण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा महाराष्ट्राने साकारला होता. त्याचे दर्शन उद्या विधिमंडळाच्या आवारात होणार आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा व विधान परिषदेत सर्वोच्च  पुरस्कार व राज्य वाङ्मय पुरस्कार विजेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात येणार आहे.

टॅग्स :विधान भवन