Join us

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसह फेरीवाल्यांसाठी मराठीचे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसह फेरीवाल्यांसाठी मराठीचे वर्गमहाराष्ट्र दिनापासून भरणार ‘माय मराठी’चे वर्ग(सूचना - ही बातमी मुंबईसह राज्याला मस्ट ...

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसह फेरीवाल्यांसाठी मराठीचे वर्ग

महाराष्ट्र दिनापासून भरणार ‘माय मराठी’चे वर्ग

(सूचना - ही बातमी मुंबईसह राज्याला मस्ट आहे. मा. विजय बाबू ची तशी सूचना आहे. असा मांजरेकर यांनी निरोप दिला आहे)

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात वर्षानुवर्षे मुक्काम आहे, चरितार्थ चालतोय, पण मराठी भाषा मात्र बोलता येत नाही, अशी असंख्य उदाहरणे आपल्या अवतीभोवती दिसतात. फेरीवाले, टॅक्सी-रिक्षा चालकांपासून अगदी सेलिब्रेटींचीही यात गणना होते. यापैकी अनेकांना मराठी शिकायची, बोलायची इच्छा असते. मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्या अशा मंडळींसाठी आता ‘माय मराठी’चे वर्ग भरणार आहेत. दिनांक १ मे, महाराष्ट्र दिनापासून मुंबई आणि ठाणे शहरात या उपक्रमाला सुरूवात होणार आहे.

राज्याच्या मराठी भाषा विभागाने अन्य भाषिकांना मराठीचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. सहज, सोप्या शैलीत मराठी भाषा शिकवण्याचा हा उपक्रम आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने यापूर्वीच अमराठी लोकांपर्यंत मराठीच्या प्रचार, प्रसारासाठी ‘माय मराठी’ नावाचा अभ्यासक्रम तयार केला होता. याच अभ्यासक्रमाच्या आधारे अमराठी रिक्षा - टॅक्सी चालक, फेरीवाले आणि मजुरांना मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत. ‘माय मराठी’ अभ्यासक्रमाच्या आधारे मराठी भाषा शिकवू शकतील, अशा स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षित स्वयंसेवक पुढे मुंबई आणि ठाण्यातील वस्त्या-वस्त्यांमध्ये मराठीचे धडे देतील. मुंबई महानगर परिसरातील रिक्षा - टॅक्सी चालक, फेरीवाले आणि मजुरांसाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या वर्षात साधारण ५० हजार जणांना मराठी शिकवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण वर्गांसाठी मुंबई महापालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने प्रभाग स्तरापर्यंत आखणी करण्यात येणार आहे. वस्ती, चाळ स्तरावर ४० ते ५० जणांचा एक वर्ग भरवला जाणार आहे. विविध विभागांकडून अमराठी श्रमिकांचा डाटा जमा केला जात आहे. विशेषतः परिवहन विभागाकडून रिक्षा-टॅक्सी चालकांची माहिती मिळाल्यानंतर अमराठी चालकांना प्रशिक्षण वर्गात सहभागी करून घेण्यासाठी संपर्क केला जाणार आहे. याशिवाय स्वतःहून प्रशिक्षण वर्गात नाव नोंदविण्याची सोयही असणार आहे.

वर्षानुवर्षे मुंबईत राहात असूनही मराठी येत नाही, अशी अनेक मंडळी आहेत. यातील अनेकांना मराठी शिकायची इच्छा असते. परंतु, योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नाही. शिवाय, काम-धंद्यामुळे एखादा क्लास लावून नियमितपणे तिथल्या वर्गांना हजेरीही लावता येत नाही, अशी स्थिती असते. अशा लोकांसाठी या माध्यमातून मराठी भाषा शिकण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘लवचिकता’ हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट असणार आहे. एखाद्या भागात, वस्तीत ४० जणांच्या बॅचला एकत्रितपणे त्यांच्या सोयीच्या एखाद्या वेळेत मराठीचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी एक सुलभ अभ्यासक्रम ‘माय मराठी’च्या रुपाने तयार आहे. त्यात आणखी आवश्यक सुधारणा सुरू आहेत.

अमराठी भाषिक वर्गातील लोकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आवश्यक संसाधन आणि सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीचे आॅनलाईन धडे देण्यात येणार आहेत. माय मराठीचा अभ्यासक्रम ऑनलाइन, अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे यांनी दिली.