Join us

पुराच्या भीतीने अनेकांनी रात्र जागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:06 IST

मुंबई : शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत कोसळलेल्या मुसळधारने मुंबईकरांची झोप उडाली. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रविवारी रात्रीदेखील पावसाचा जोर ...

मुंबई : शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत कोसळलेल्या मुसळधारने मुंबईकरांची झोप उडाली. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रविवारी रात्रीदेखील पावसाचा जोर शनिवारप्रमाणे राहील आणि घरात पुन्हा पावसाचे पाणी शिरेल या भीतीने अनेकांनी रविवारची रात्र जागविली. मात्र, वरुणराजाने कृपा दाखविल्याने सुरू असलेल्या पावसाचा वेग कमी राहिल्याने तुलनेने मुंबईत कोठेही पावसाचे पाणी साचले नाही. परिणामी अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, शनिवारी रात्रीच्या पावसाने अनेक मुंबईकरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दक्षिण मध्य मुंबईतल्या बीडीडी चाळी, सायन येथील प्रतीक्षानगरमधील झोपड्या, दादर येथील हिंदमाता, माटुंगा येथील गांधी मार्केट, कुर्ला येथील क्रांंतिनगरसह मालाड, विलेपार्ले, विद्याविहार येथील सखल भागासह अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. शिवाय ज्या वस्त्या अगदी सखल भागात आहेत. नालेशेजारी जी घरे आहेत अशा घरांसह तळमजल्यावर वास्तव्यास असलेल्या अनेकांच्या घरांत पाणी शिरले होते. सायन येथील प्रतीक्षानगरलगत झोपड्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या संतोष मोरे यांनी सांगितले की, येथे मोठ्या प्रमाणावर इमारतींचे काम सुरू आहे. येथील सांडपाण्याचा त्रास लगतच्या वस्तीमधील नागरिकांना होत आहे. येथील रस्त्यावरून अवजड वाहने जात असून, लगतच्या झोपड्यांना भेगा पडल्या आहेत. समस्यांमध्ये वाढ होत असून, याकडे कोणी लक्ष देत नाही. शनिवारच्या पावसात येथील किमान आठ ते नऊ लोकांच्या घरात कंबरेएवढे पावसाचे पाणी साचले होते.

सायन प्रतीक्षानगर येथील वस्त्यांसह मुंबईतल्या बहुतांश वस्त्यांमध्ये वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना तीन दिवसांत पडलेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. घरात शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे आर्थिक नुकसान होत असून, मानसिक त्रास होत असल्याचे अनेकांनी सांगितले. सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने मुंबईकरांना दिला मिळाला खरा. मात्र, मुंबईकरांची टांगती तलवार कायमच आहे.