वैभव गायकर, नवी मुंबईकच-यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती व्हावी या हेतूने खारघर ग्रामपंचायतीने ठराव करून थेट पुण्यावरून आणलेल्या मशिन खारघरमधील स्पॅगेटी सोसायटीत धूळखात पडलेल्या आहेत. सिडको जागा देत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत करीत आहे. सुमारे सव्वा कोटी रु पये खर्चून खारघर ग्रामपंचायतीने तेरा मशिन खरेदी केल्या आहेत. त्यापैकी तीन मशिन ग्रामपंचायतीने आणल्या असून जागेचा अभाव, तसेच ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे या मशिन बंद आहेत. खारघरमधील स्पॅगेटी वसाहतीमधील प्रियदर्शनी सोसायटीने या मशिनची मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यानंतर पुण्यावरून आणलेल्या तीनही मशिन या वसाहतीला ग्रामपंचायातीने दिल्या. यामधील एका मशिनची किंमत दहा ते पंधरा लाखांच्या घरात आहे, मात्र जवळजवळ महिना होवूनही या मशिन कार्यरत झालेल्या नाहीत. ही मशिन सुरू करण्यासाठी विजेचे कनेक्शन तसेच त्यासाठी आॅपरेटरची आवश्यकता आहे, मात्र सोसायटीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती एका ग्रामपंचायत सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. शहरात कमी असलेल्या कचरा कुंड्या तसेच सिडकोकडे जागेची मागणी करून देखील आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता पाटील यांनी केला आहे. पनवेल तालुक्यातील सर्वच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चर्चासत्र पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकतेच झाले. यावेळी खारघरमधील कचऱ्याचा प्रश्न याठिकाणी विचारला होता. पाचशे मीटरवर कचरा कुंड्या ठेवण्यात याव्यात, तसेच खतनिर्मिती करणाऱ्या मशिनसाठी जागा उपलब्ध करण्याच्या मागणीचा पुनरु च्चार करण्यात आला. मात्र सिडकोकडून जागा देण्यावर हा प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.
खतनिर्मितीची मशिन ‘कच-यात’
By admin | Updated: December 22, 2014 02:31 IST