Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादकांना आणि आयातदारांना वस्तुंच्या वेष्टनावर प्रत्यक्ष उत्पादनाचा महिना आणि वर्ष घोषित करणे आता बंधनकारक

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 3, 2024 17:03 IST

त्यामुळे आता ग्राहकांना वस्तु केव्हा उत्पादित केली आहे, किती नवी, जुनी आहे हे विकत घेताना कळू शकेल.

मुंबई- दि,१ जानेवारी २०२४ पासून आवेष्टीत वस्तुंच्या उत्पादकांना आणि आयातदारांना वेष्टनावर उत्पादनाचा महिना आणि वर्ष घोषित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आजवर उत्पादकांना आणि आयातदारांना वस्तुंच्या आवेष्टनांवर प्रत्यक्ष वस्तु उत्पादनाचा किंवा ती वस्तु आवेष्टीत केल्याचा किंवा ती वस्तु आयात केल्याचा महिना आणि वर्ष छापण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळे बहुतांश प्रकरणांत वस्तु आवेष्टीत केल्याचा किंवा आयात केल्याचा महिना आणि वर्ष आवेष्टनावर छापत असत. त्यामुळे ती वस्तु प्रत्यक्ष केव्हा उत्पादित केली आहे किंवा किती जुनी आहे हे ग्राहकांना कळण्यास मार्ग नव्हता. परंतू दि,१ जानेवारी २०२४ पासून केंद्र सरकारने हे स्वातंत्र्य संपुष्टात आणून उत्पादक आणि आयातदारांना वेष्टनावर प्रत्यक्ष उत्पादनाचा महिना आणि वर्ष घोषित करणे बंधनकारक केले आहे, तसेच विशिष्ट वजनातच वस्तू विकण्याचे बंधन हटवले असल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी लोकमतला दिली.

त्यामुळे आता ग्राहकांना वस्तु केव्हा उत्पादित केली आहे, किती नवी, जुनी आहे हे विकत घेताना कळू शकेल. ‌तसेच एम.आर.पी. किंमती शिवाय आवेष्टीत वस्तुंवर प्रती युनिट किंमत छापणे सुध्दा दि,१ जानेवारी २०२४ पासून बंधनकारक केले आहे. उदा. एखादी ५०० ग्रॅम वजनाची वस्तु विकायची असल्यास त्याच्या एम. आर. पी. किंमती बरोबरच त्याची प्रती ग्रॅम किंमत छापणे सुध्दा आता बंधनकारक करण्यात आले आहे. अनेकदा अनेक वस्तु वेगवेगळ्या वजनात बाजारात उपलब्ध असतात. उदा. 80 ग्रॅमची रु 75  एमआरपी असलेली टुथपेस्ट आणि 120 ग्रॅमची रु. 108 एमआरपी ची टुथपेस्ट या दोन किंमतीची तुलना ग्राहकाला सहजासहजी करता येणे कठीणच आहे. पण याच दोन्ही टुथपेस्टवर अनुक्रमे ९३ पैसे/ग्रॅम आणि ९० पैसे/ग्रॅम अशी प्रति युनिट किंमत दिसेल तेव्हा त्याला कळेल की १२० ग्रॅम वजनाची टुथपेस्ट ही तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त आहे. त्यामुळे ही प्रती युनिटची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी दूध, चहा, बिस्किटे, खाद्य तेले, पिठे, शीत पेये, पेयजल, बालान्न, डाळी, कडधान्ये, ब्रेड, डिटर्जंट, सिमेंट यांसारख्या १९ वस्तु विशिष्ट वजनातच म्हणजे ५०, ७५, १००, १५० ग्रॅम्स किंवा ठराविक किलो वा लिटर मधेच विकणे बंधनकारक होते. त्यामुळे आतापर्यंत बाजारात वरीलप्रमाणे दोन, तीन ठराविक वजनाचेच ब्रेड, टुथपेस्ट, साबण, पेयजलाच्या बाटल्या बघायला मिळायच्या. आता दि, १ जानेवारी पासून उत्पादकांवरील हे बंधन काढून टाकण्यात आले आहे. आणि त्यामुळे आता हेच ब्रेड, टुथपेस्ट, साबण ५०, ६०, ७०, ७५, ८० ग्रॅम्स अशा कोणत्याही वजनात बाजारात येऊ शकतील (किंबहुना आलेले आहेत). 

ग्राहकांना गोंधळात टाकण्यासाठीच उत्पादकांनी ही मागणी केली असणार असं म्हणायला जागा आहे. परंतु त्याचबरोबर ग्राहकांचा हा गोंधळ कमी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रती युनिट किंमत छापण्याचे बंधन घालून यात ग्राहकांचा गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला आहे असे अँड.शिरीष देशपांडे यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :मुंबई