Join us

‘तो मांत्रिक’ महापालिकेचा मुकादम..!

By admin | Updated: May 20, 2015 00:37 IST

धारावी पोलिसांनी गजाआड केलेला मांत्रिक प्रत्यक्षात मुंबई महापालिकेचा मुकादम असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मनीषा म्हात्रे ल्ल मुंबईधारावी पोलिसांनी गजाआड केलेला मांत्रिक प्रत्यक्षात मुंबई महापालिकेचा मुकादम असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. घनकचरा व्यवस्थापनाची घडी बसविल्यानंतर अंगाला अंगारा फासून हा बाबा लोकांंचे भूत उतरवू लागला आणि अनेकांना गंडा घालू लागला, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुरेश रामा कुंचीकुर्वे (५०) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. धारावीच्या ९० फुटी रस्त्यावर त्याचे घर आहे. गेल्या ५० वर्षांपासून त्याचे वडील घराशेजारील धार्मिक स्थळाजवळ भूत, प्रेत उतरविण्याचे काम करत होते. लहानपणापासून वडिलांच्या या अघोरी विद्येचा सुरेशवरही परिणाम होत गेला. वडिलांसोबत तोही त्यांच्या व्यवसायात सहभागी होत गेला. दहा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर सुरेशने त्यांचा वारसा सुरू ठेवला. अडगळीच्या ठिकाणी सुरेशचा हा कारभार सुरू असल्याने यावर कुणाचे लक्ष गेले नाही. महापालिकेच्या ‘एफ-साऊथ’ विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागात सुरेश मुकादम म्हणून कार्यरत होता. सकाळी मुकादम तर सायंकाळी हातात झाडू आणि अंगाला अंगारा फासून हा मांत्रिकबाबा बनायचा. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भुताने झपाटल्याची भीती घालायचा. पुढे ते भूत उतरविण्याच्या नावाखाली पैसे उकळायचा. तंत्र मंत्रांसोबत तो आलेल्या प्रत्येकाला झाडून मारहाण करायचा. भुताला बाहेर काढण्यासाठी रात्री, अपरात्री झाडाच्या मध्यभागी लोखंडी साखळीने त्या व्यक्तीला उपाशीपोटी बांधायचा. सोमवारी त्याने गणेश कुरवे नावाच्या तरुणाला भूत उतरविण्याच्या नावाखाली सुरेशने रखरखत्या उन्हात झाडाला बांधून ठेवले होते. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरेशच्या मुसक्या आवळल्या. पुढील चौकशीत सुरेशचा पर्दाफाश झाला. जादूटोणा विधेयकानंतर्गत सुरेशवर कारवाई करत न्यायालयाने २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत सुरेशने कीती जणांना गंडवले याचा अधिक तपास सुरु असल्याची माहीती धारावी पोलिसांनी दिली.स्वखुशीने पैसे द्या, भूत पळवा : कुर्वेकडे जाणारे अंधश्रद्धाळू नागरिकांकडून तो थेट पैसे मागत नव्हता. भूत पळविण्यापूर्वी स्वखुशीने ठेवलेले पैसे तो स्वीकारायचा. त्यातही एखादा व्यक्ती जाळयात अडकल्यानंतर त्यांच्याकडून विविध विधींच्या नावाखाली खर्च दाखवून पैसे उकळत असल्याची माहितीही समोर आली.