Join us

प्रभाग अध्यक्षपदावरून मनसेत बेबनाव

By admin | Updated: April 26, 2015 22:34 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ७ प्रभागांपैकी २ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी मनसेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले असले तरी उमेदवारी देण्यावरून

प्रशांत माने, कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ७ प्रभागांपैकी २ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी मनसेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले असले तरी उमेदवारी देण्यावरून मनसेत बेबनाव निर्माण झाला आहे. त्यात दुसरीकडे पक्षीय राजकारणाला कंटाळून तिच्या दोन पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी भाजपात प्रवेश केल्याने मनसेत आलबेल नसल्याचे समोर आले आहे.महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक सोमवारी २७ एप्रिल रोजी होत आहे. ७ पैकी ५ प्रभागांमध्ये एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या समित्यांचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. यातील ग आणि फ या दोन समित्या मनसेने बिनविरोध पटकाविल्या असल्यातरी यावरून पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. फ प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळावे अशी इच्छा नगरसेवक राहुल चितळे यांनी व्यक्त केली होती. परंतु त्यांची मागणी अमान्य करीत मनोज राजे यांची दुस-यांदा समितीवर वर्णी लावल्याने चितळे हे नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे ग प्रभाग समितीच्या मावळत्या अध्यक्षा कोमल निग्रे यांनी ही महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीला ४ ते ५ महिन्यांचा कालावधी राहील्याने अध्यक्षपदी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. परंतु त्यांची ही मागणी अमान्य करीत राजेश पाटील यांनाही दुसऱ्यांदा संधी देण्यात आल्याने निग्रे ही नाराज झाल्या आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त करताना पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याची सूत्रांची माहीती आहे. यासंदर्भात चितळे यांनी चुप्पी साधली असली तरी निग्रे यांनी नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना पक्षाचा आदेश मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)