मुंबई : भारत-चीन मैत्रीचे प्रतिक म्हणून ओळख असलेले डॉ. द्वारकानाथ कोटनीस यांच्या भगिनी मनोरमा कोटनीस (९४ ) यांचे दीर्घकालीन आजाराने शुक्रवारी पहाटे विलेपार्ले येथील राहत्या घरी निधन झाले. मनोरमा कोटनीस आहार विशेषज्ज्ञ म्हणून परिचित होत्या. मात्र दीर्घकालीन आजाराने त्यांची प्रकृती खालावत चालली होती. मनोरमा यांनी आपले दिवंगत बंधूंच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविला होता. चीन नेत्यांच्या परंपरेचे पालन करत २०१३ साली भारत दौऱ्यावर आलेले चीनचे प्रधानमंत्री ली क्विंग यांनी मनोरमा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान ली यांनी आनंद व्यक्त करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. विशेष म्हणजे भारत दौऱ्यादरम्यान सर्व चीन नेते कोटनीस कुटुंबाची भेट घेत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले होते. डॉ. द्वारकानाथ कोटनीस यांनी १९३७-४५ दरम्यान जपानने केलेल्या आक्रमणावेळी चीनी सैनिकांची सुश्रुषा केली होती. या कार्याचा आजही चीनकडून गौरवाने उल्लेख केला जात असल्याचेही ली यांनी भेटीदरम्यान नमूद केले होते. (प्रतिनिधी)
मनोरमा कोटनीस यांचे दीर्घ आजाराने निधन
By admin | Updated: July 4, 2015 03:19 IST