Join us

मानखुर्दमध्ये चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या

By admin | Updated: March 8, 2016 02:45 IST

घराबाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण करुन बलात्कार आणि नंतर हत्या केल्याची घटना सोमवारी मानखुर्द येथे घडली

मुंबई: घराबाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण करुन बलात्कार आणि नंतर हत्या केल्याची घटना सोमवारी मानखुर्द येथे घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरु केला आहे. मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरातील फुटपाथवर ही मुलगी आई-वडिलांसह राहत होती. याच ठिकाणी तिचे आई-वडिल कुरमुरे विकण्याचा व्यवसाय करतात. रविवारी रात्री ११ वाजता ही मुलगी याच ठिकाणी खेळत असताना अचानक गायब झाली. तिच्या आई-वडिलांनी बराच वेळ तिचा परिसरात शोध घेतला, मात्र ती आढळली नाही. अखेर मध्यरात्री त्यांनी मानखुर्द पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत मुलीचा शोध सुरु केला. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मानखुर्द टी जंक्शन परिसरातील एका भिंतीलगत या मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला.या प्रकरणाच्या शोधासाठी स्थापन केलेल्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याआधारे पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या दोन वर्षांमध्ये मानखुर्द आणि शिवाजी नगरात अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन बलात्कार केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिकांमद्ये भीतीचे वातावरण असून अशा आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)