Join us

आवक कमी झाल्याने आंब्याच्या किमती वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 02:05 IST

मध्यम प्रतीचा आंबा प्रति डझन ५०० : किरकोळ बाजारात घाऊक बाजारापेक्षा दुप्पट दर

मुंबई : आंब्याची मागणी वाढत असतानाच आवक कमी झाल्याने आंब्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातील हापूस आंब्यांची किंमत घाऊक बाजारापेक्षा दुप्पट आहे. घाटकोपर, कुर्ला, दादर, वांद्रे, येथील किरकोळ फळ बाजारात डझन आणि किलोप्रमाणे आंब्यांची खरेदी-विक्री केली जात आहे. किरकोळ बाजारात मध्यम प्रतिच्या आंब्यांची किंमत प्रति डझन ५०० रुपयांपासून आहे. उत्तम प्रतिच्या आंब्यांची किंमत प्रति डझन १ हजारपासून आहे.वाशी येथील घाऊक बाजारात शनिवारी कोकणी हापूस आंब्यांची ५३ हजार पेट्यांची अवाक झाली आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून २९ हजार आंब्यांच्या पेट्यांची आवक झाली आहे, असे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. आठवड्यापूर्वी कोकणी हापूस आंब्यांची आवक ५६ हजार पेट्यांची झाली होती, तर दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून ३० हजार पेट्यांची आवक झाली होती. आवक कमी झाली असतानाच मागणी वाढल्यामुळे आंब्यांच्या किमती वाढल्या आहेत.मागील वर्षी याच महिन्यात कोकणातील आंब्यांची आवक ९० हजार पेटी, तर दक्षिण भारतातील आवक ४० हजार पेटी होती. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा या वर्षी आंबा कमी प्रमाणात दाखल होत आहे. दरम्यान, कोकणी हापूस आंबा म्हणून कर्नाटकी आंब्याची विक्री करत ग्राहकांची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे ग्राहकांनी आंबे खरेदी करताना खबरदारी पाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.गुणवत्तेवर ठरते किंमतआंब्यांच्या गुणवत्तेवर त्याची किंमत ठरत असते. डाग असलेले व छोट्या आंब्यांची किंमत कमी आहे. त्यामुळे प्रत्येक आंब्यांची किंमत कमी-जास्त प्रमाणात होत आहे. आंब्यांचे उत्पादन कमी झाले. मात्र, १५ ते २० दिवसांत आंब्यांची आवक वाढणार आहे. सध्याचे वातावरण संमिश्र असल्यामुळे आवक कमी-जास्त होत आहे. सुट्टीचे दिवस असल्यामुळे आणि आवडते फळ असल्यामुळे आंबा खरेदीकडे ग्राहक वळत आहेत, असे व्यापारी महेश मुंडे यांनी सांगितले.अलिबागपासून ते वेंगुर्ल्यापर्यंतचा उत्तम प्रतिचा आंबा प्रति डझन ८०० ते २ हजार रुपये दराने विकला जात आहे. मध्यम प्र्रतिचा हापूस आंबा ३०० ते १ हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथील उत्तम प्रतिचा हापूस आंबा प्रति किलो १५० ते २०० रुपये दराने विकला जात आहे. मध्यम प्रतिचा आंबा ५० ते १२० रुपये किलो दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात आंब्यांची प्रति डझन ५०० रुपयांपासून ते ३ हजार ५०० रुपये दराने विक्री होत आहे.

टॅग्स :आंबा