Join us  

दोन सोसायट्यांच्या वादात आंबा, फणस, नारळाच्या झाडांची छाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 2:44 AM

कांदिवली पश्चिमेकडील चारकोप सेक्टर ४ मधील त्रिशूल को- आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी येथील झाडांची छाटणी करण्यात आली आहे.

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील चारकोप सेक्टर ४ मधील त्रिशूल को- आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी येथील झाडांची छाटणी करण्यात आली आहे. यात आंबा, फणस, निम, अशोका, बदाम आणि नारळ या झाडांचा समावेश आहे. प्रसाद को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड या गृहनिर्माण सोसायटीच्या खोली क्रमांक १५ ते १७ च्या पत्र्यावर आंब्याची फांदी पडली. या वेळी पत्र्याचे नुकसान झाले असून त्याची भरपाई त्रिशूल सोसायटीने द्यावी, अशी मागणी प्रसाद सोसायटीने केली आहे. मात्र, त्रिशूल सोसायटीने पुढील धोका लक्षात घेऊन झाडांची छाटणी करू दिली.प्रसाद सोसायटीचे सचिव गुरुनाथ पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की, आंब्याची फांदी पत्र्यावर पडली. पत्र्याचे नुकसान झाले, मात्र अद्यापही त्याची नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. झाडाच्या फांद्या आम्ही स्वत:हूनच छाटल्या. नगरसेविका यांच्या पतीला समस्या सांगून कोणी झाडे छाटण्यासाठी आले नाही. शेवटी आम्हीच झाडे छाटून पाल्याची विल्हेवाट लावली आणि लाकडे सोसायटीच्या कार्यालयात जमा केली आहेत. पंचनामा करण्यात आलेला नाही, कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे कोणाचेही सहकार्य मिळाले नाही.स्थानिक नगरसेविका संध्या दोशी यांनी सांगितले की, प्रसाद सोसायटीच्या घरांवरील पत्र्यावर त्रिशूल सोसायटीच्या झाडाच्या फांद्या आल्या होत्या.त्रिशूल सोसायटीची पहिली कमिटी ही प्रसाद सोसायटीला सहकार्य करीत नव्हती. त्यामुळे प्रसाद सोसायटीने वारंवार अर्ज महापालिका आणि स्थानिक नगरसेविकेला दिला. ज्या वेळी आंब्याची फांदी पत्र्यावर पडली तेव्हा सुदैवाने घरातील माणसे गावी गेली होती. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची पोलिसात तक्रारही देण्यात आली आहे. तसेच महापालिकेलाही पत्र पाठवून सोसायटीची दखल घेण्यास सांगितले.त्रिशूल सोसायटीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून ही झाडे उभी आहेत. अनधिकृत बांधकामाच्या आड झाडे आली की, लोकांना झाडांचा त्रास होतो. त्यामुळे झाडांची तोड करण्यासाठी त्रागा केला जातो. चारकोपमध्ये अनधिकृत बांधकामे केली जातात, याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. झाडांची तोड करून आपण पर्यावरणाची हानी करीत आहोत हे लोकांना कधी कळणार? अशी खंत सोसायटीतील स्थानिकांनी व्यक्त केली.महापालिकेच्या आर/मध्य विभागाच्या कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांनी वृक्षांची पाहणी केली. फांद्यांचा विस्तार व वाढ अतिरिक्त झाली आहे. फांद्या खिडकीमध्ये घुसल्या आहेत. फांद्या मृत झाल्या आहेत, जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी सदर वृक्षांचा समावेश केलेल्या फांद्या तोडण्याची परवानगी कार्यालय देत आहे, असे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.पावसाळ्याच्या आधी झाडांचे ट्रिमिंग केली जाते. परंतु येथे ट्रिमिंगच्या नावाखाली मोठ्या झाड्यांच्या मोठमोठ्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. अशी स्थिती गेल्या काही दिवसांपासून चारकोपमध्ये सुरू आहे.- मिली शेट्टी, पर्यावरणप्रेमी.

टॅग्स :मुंबई