नवी मुंबई : आघाडी सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांचा बेलापूर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी १४९१ मतांनी धक्कादायक पराभव केला आहे. त्यामुळे त्या आता जायंट किलर ठरल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचेही विजयाचे स्वप्न भंगले आहे. राज्यामधील प्रमुख लढतींमध्ये नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री व दहा वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविलेले गणेश नाईक राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये गेलेल्या मंदा म्हात्रे व सेनेमधून निवृत्त सनदी अधिकारी विजय नाहटा निवडणूक लढवत होते. पहिल्या फेरीपासून चुरस निर्माण झाली होती. कधी भाजपा, कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीवर जात होती. प्रत्येक फेरीप्रमाणे निकाल बदलत होता. नक्की कोण जिंकणार याचा अंदाज बांधणे कठीण गेले होते. अखेर २६ व शेवटच्या २७ व्या फेरीमध्ये १४९१ मतांनी आघाडी घेऊन मंदा म्हात्रे विजयी झाल्या. भाजपाच्या मंदा म्हात्रे यांना ५५३१६ मते पडली आहेत. गणेश नाईक यांना ५३८२५ व सेनेच्या विजय नाहटा यांना ५०९८३ मते पडली आहेत. चौथ्या क्रमांकावर गेलेल्या काँगे्रसला १६६०४ मते पडली आहेत.
मंदा म्हात्रेंनी केला नाईकांचा पराभव
By admin | Updated: October 20, 2014 02:58 IST