Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मामि’ रंगणार २९ आॅक्टोबरपासून!

By admin | Updated: October 8, 2015 05:21 IST

देशविदेशातील उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश असलेला ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २९ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. यंदाचे या महोत्सवाचे हे १७ वे वर्ष आहे.

मुंबई: देशविदेशातील उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश असलेला ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २९ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. यंदाचे या महोत्सवाचे हे १७ वे वर्ष आहे.‘इंडिया स्टोरी’ या भारतीय चित्रपटांच्या विभागात देशातील २९ भाषांतील २४८ चित्रपट दाखल झाले आहेत. यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांसाठी ‘एक्सपरिमेंटल सिनेमा’ असा विशेष विभाग करण्यात आला आहे. तसेच ‘हाफ तिकीट’ या नावाने या महोत्सवात प्रथमच बालचित्रपट महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. मुख्य प्रवाहातील चित्रपट आणि लघुपट मिळून देशविदेशातील २५ चित्रपटांचा या विभागात समावेश करण्यात आला आहे.या महोत्सवादरम्यान ‘मामि मूव्ही मेला’ अशी अनोखी संकल्पना यावेळी राबविण्याच्या दृष्टिने ३१ आॅक्टोबर रोजी मेहबूब स्टुडिओला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संगीतकार ए. आर. रेहमान यांनी या ‘मामि’ महोत्सवाची सिग्नेचर ट्यून तयार केली आहे. १७ व्या मामि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत या महोत्सवाच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी दिवाकर बनर्जी, विशाल भारद्वाज, सिद्धार्थ रॉंय कपूर, अनुपमा चोप्रा, किरण राव, स्मृती किरण आदी ‘मामि’च्या समितीवरील मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रातील लोकांचे सहकार्य या महोत्सवाला लाभले असून, महाराष्ट्र शासनाचे पाठबळही महोत्सवाला मिळत असल्याचे अनुपमा चोप्रा यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्र्रतिनिधी)सलीम खान-जावेद अख्तर यांचा सत्कारयंदाच्या ‘मामि’ महोत्सवात चित्रपटांच्या दुनियेत अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी दोन विभाग निश्चित करण्यात आले आहेत. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दिग्दर्शक एमॉंस गिताई यांना देण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल कथा व संवादलेखक सलीम-जावेद या जोडीला, म्हणजेच सलीम खान व जावेद अख्तर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.