Join us

पावसाळ्यानंतरही मलेरियात वाढ

By admin | Updated: October 15, 2015 02:16 IST

पावसाळा संपत आला असला तरीही साथीच्या आजारांनी मुंबईकर बेजार झाले आहेत. ६ ते ११ आॅक्टोबर दरम्यान मलेरियाचे २३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत

मुंबई : पावसाळा संपत आला असला तरीही साथीच्या आजारांनी मुंबईकर बेजार झाले आहेत. ६ ते ११ आॅक्टोबर दरम्यान मलेरियाचे २३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर गॅस्ट्रोच्या रुग्णांची आकडेवारी १९७ वर पोहोचली आहे. जुलै महिन्यापासून स्वाइन फ्लूचे रुग्ण मुंबईत आढळायला सुरुवात झाली होती. पण अजूनही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. सहा दिवसांमध्ये स्वाइनचे फक्त ११ रुग्ण आढळून आले आहेत. पावसाळा संपून उकाडा सुरू झाला आहे. वाढत्या तापमानाचा त्रास मुंबईकरांना व्हायला लागला आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये २ हजार ८४६ तापाचे रुग्ण आढळून आले आहेत.उकाडा वाढल्यामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ, थंड पदार्थ खाल्ले जातात. पण त्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सहा दिवसांत १९७ गॅस्ट्रोचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. टायफॉइडचे ३५, काविळीचे ३१, लेप्टोचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीही डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. सहा दिवसांमध्ये १ हजार ९७ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी अशी डेंग्यूसदृश लक्षणे या रुग्णांमध्ये आढळून आली आहेत. पण हे रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह नाहीत. या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी अनेकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)190ठिकाणी आढळले डेंग्यूचे डास आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. पावसाळ्यानंतरचे वातावरण हे डासांची पैदास होण्यास पोषक असते. त्यामुळेच महापालिकेने डेंग्यूच्या डासांची शोधमोहीम जोरदार सुरू केली आहे. मुंबईत सहा दिवसांमध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याची १९० ठिकाणे शोधून काढली. ही ठिकाणे साफ करण्यात आली. डी विभागात राहणाऱ्या एका १८ वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. या मुलाला आठ दिवस ताप, थंडी असा त्रास जाणवत होता. ताप उतरत नसल्यामुळे ८ आॅक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवार, ११ आॅक्टोबर रोजी या मुलाचा उपचारादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास मृत्यू झाला. डेंग्यूमुळे त्याच्या श्वसन यंत्रणेवर परिणाम झाला होता.