मुंबई : सायन रुग्णालयाच्या वसतिगृहातील 25 वर्षीय डॉक्टरने त्याच्या 28 वर्षीय महिला डॉक्टरचा आंघोळ करताना अश्लील व्हिडीओ काढल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. विपूल सुनील चौधरी असे या आरोपी डॉक्टरचे नाव असून, महिलेच्या सतर्कतेमुळे कर्मचा:यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली अटक केलेल्या चौधरी याची न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली.
जळगावचा रहिवासी असलेला विपूल मागील दोन वर्षापासून रुग्णालयातील डॉक्टरांसाठीच्या असलेल्या वसतिगृहात वास्तव्य करीत होता. तो वास्तव्य करीत असलेल्या मजल्यावर पीडित महिला वास्तव्य करीत असून, गुरुवारी दुपारी ती आंघोळीसाठी स्वच्छतागृहात गेली होती. तिच्या मागावर असलेला विपूल याने त्याच स्वच्छतागृहालाच लागून असलेल्या शौचालयात प्रवेश केला. आणि भिंतीवर मोबाइल ठेवून तिचे चित्रण करू लागला. महिला डॉक्टरच्या हे लक्षात येताच तिने भिंतीवरील मोबाइल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसल्यानंतर ती स्वच्छतागृहातून बाहेर पडली. विपूल शौचालयात दबा धरून बसला असतानाच पीडित महिला डॉक्टरने बाहेर येऊन आरडाओरडा सुरू केला आणि कर्मचा:यांना बोलावले. कर्मचा:यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.(प्रतिनिधी)